चीनची मुलगी होणार संगमनेरची सून, योग शिक्षणातून जुळला ‘लग्नाचा योग’

0
51

योग शिक्षण केंद्र चालवण्यासाठी चीनमध्ये गेलेल्या संगमनेर तालुक्यातील भोजदरी येथील रहिवासी योगशिक्षक राहुल हांडे याची योगक्षेत्रातील कर्तबगारी पाहून आपल्या मुलीशी

लग्न करण्याचे साकडे घालणाऱ्या चीनमधील दांपत्याच्या मागणीला मान देत राहुल हांडे हा चीनमधील मुलीशी विवाहबद्ध होत आहे. योग शिक्षणातून ‘हिंदी – चिनी सगे सोयरे’ होण्याचा मान संगमनेर तालुक्याला मिळाला आहे.संगमनेर तालुक्यातील आशिया खंडातील सर्वात उंच आणि मोठे असलेले बाळेश्वरचे पठार हे प्रसिद्ध आहे. याच पठार भागातून भोजदरीच्या माध्यमिक विद्यालयातून शिकलेला विद्यार्थी राहुल याने योग क्षेत्रात भविष्यात काही संधी शोधण्यासाठी सन-२०११ साली प्रा.डॉ.राजेंद्र वामन यांच्या मार्गदर्शनानुसार संगमनेर महाविद्यालयात इयत्ता अकरावी साठी प्रवेश घेतला. 

घरची परिस्थिती बेताची असल्याने राहणे-खाणे परवडणारे नव्हते. निसर्गोपचार केंद्रात राहण्याची सोय झाली व अण्णासाहेब वाडेकर यांच्या खानावळीत जेवणाची सोय झाली. खानावळीतील मिळेल ते काम करणे. अगदी वेळेला स्वयंपाक, भाजी, भांडी घासण्यापासूनचे काम केले. केवळ जिद्द चिकाटीच्या जोरावर व दैनंदिन योगाचे धडे गिरवत पुणे विद्यापीठाच्या योग संघात राष्ट्रीय पातळीवर राहुलची निवड झाली.
दीड वर्ष कालावधीचे योग निसर्गोपचार डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण करत इंग्रजी व योगाची शिक्षणातून पदवी पूर्ण केली. पदवीनंतर कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ, नागपूर यांची एम.ए.योग पदवुत्तर पदवी मिळवली.

योग शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रा.डॉ.राजेंद्र वामन व माजी विद्यार्थी देवा उर्फ म्हाळू शेरमाळे यांच्या मार्गदर्शनाने चीन येथे योगशिक्षक म्हणून राहुल कार्यरत आहे. तेथे जाऊन इतरांच्या हाताखाली किती दिवस काम करणार म्हणून स्वतःचे योग केंद्र मकाऊ, चायना या देशात सुरू केले. 

राहुल हांडे याची कर्तबगारी पाहून चीनमधील योंग छांग व त्यांची पत्नी मेई लियान या जोडप्याने आपली कन्या शान हिच्यासाठी राहुल कडे मागणी घातली. राहुल व त्यांची आई, वडील, भाऊ, बहीण सर्वांनी अखेर प्रा.डॉ.राजेंद्र वामन यांच्या मार्गदर्शनानुसार होकार दिला. ज्या पठार भागात नदीकाठचे माणसे आजही दुष्काळामुळे मुली द्यायला का-कू करतात. अशा दुष्काळी पठार भागातील मुलाला केवळ कर्तव्य आणि योग क्षेत्रातील कलागुण या जोरावर आज आंतरराष्ट्रीय व्यक्तीने लग्नासाठी मागणी घालावी ही अति आनंदाची व अभिमानाची बाब आहे.

या दोघांचा हळदी समारंभ रविवार २ जुलै २०२३ व लग्न समारंभ सोमवार ३ जुलै २३ रोजी घारगाव येथे पार पडत आहे. या निमित्ताने दोन्ही देशांची सांस्कृतिक देवाणघेवाण व चालीरीती, रूढी परंपरा यांचा अभ्यास होईल. या समारंभास संगमनेर महाविद्यालय योग विभाग प्रमुख प्रा.डॉ.राजेंद्र वामन, प्राचार्य प्रा.डॉ.अरुण गायकवाड, उपप्राचार्य इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.डॉ.रवींद्र ताशीलदार व योग विभागातील कर्मचारी श्री ऋषिकेश पवार व महाविद्यालयातील कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. या आगळ्यावेगळ्या विवाहाची तालुक्यात कुतूहलाने चर्चा सुरू आहे.