बाजार समिती रणधुमाळी…प्रा.शशिकांत गाडे म्हणाले कर्डिलेंची दहशत मोडित काढणारं.

0
23

नगर – नगर तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांचे वाटोळे करणार्‍या माजी आ. शिवाजी कर्डिले यांची नगर बाजार समितीत असलेली दहशत या निवडणुकीत महाविकास आघाडी मोडीत काढणार असून मोठ्या मताधिक्क्याने बाजार समितीत सत्ता मिळविणार असल्याचा दावा महाविकास आघाडीचे नेते व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी व्यक्त केले.
बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडीच्यावतीने पत्रकारांशी शुक्रवारी (दि.७) सकाळी संवाद साधण्यात आला. त्यावेळी प्रा. गाडे बोलत होते. यावेळी काँग्रेसचे नेते संपतराव म्हस्के, जि.प.चे माजी उपाध्यक्ष प्रताप शेळके, माजी जि.प. सदस्य बाळासाहेब हराळ, बाबासाहेब गुंजाळ, उद्धवराव दुसुंगे, भाऊसाहेब काळे, संदीप कर्डिले, अजय लामखडे, शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र भगत, प्रकाश कुलट, राष्ट्रवादी युवकचे गौरव नरवडे आदी उपस्थित होते. प्रा. गाडे पुढे म्हणाले, या निवडणुकीत कर्डिले गटाचे पानीपत करण्यासाठी महाविकास आघाडीने जिल्हा परिषद सदस्य किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अंकुश शेळके, अजय लामखडे, संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, शरद झोडगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे ८०-८५ टक्के मतदार आमच्या गटाचे असल्याच्या वल्गना करणार्‍या कर्डिले गटाचे धाबे दणाणले असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कर्डिले २५ वर्षे आमदार होते. या काळात त्यांनी तालुक्यात विकास कामे करण्याऐवजी स्व. दादा पाटील शेळके यांनी उभ्या केलेल्या सहकारी संस्था मोडीत काढण्याचे काम त्यांनी केले आहे. नगर तालुक्यातील बाजार समिती ही एकमेव सहकारी संस्था उरली आहे. या संस्थेचेही लचके करण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. मात्र आता त्यांना पुन्हा बाजार समितीत संधी मिळू द्यायची नाही असा चंग महाविकास आघाडीने तसेच मतदारांनीही बांधला आहे. महाविकास आघाडीला माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे, आ. निलेश लंके, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घन:श्याम शेलार यांच्यासह महाआघाडीच्या सर्वच नेते मंडळींचे पाठबळ मिळत आहे. त्यामुळेच मागील वेळी त्यांच्या बरोबर असलेले अनेक जण यावेळी महाआघाडीसोबत आहेत, असेही ते म्हणाले.
दूध संघाच्या जागेचे काय झाले?
दूध संघाची सावेडीत महामार्गालगत ४ एकर जागा होती. या जागेचेे काय झाले? ती कोणाला व कितीला विकली? त्यातून आलेले पैसे गेले कुठे? याची उत्तरे शिवाजी कर्डिले यांनी या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जाहीरपणे द्यावीत, असे आव्हानही प्रा. गाडे यांनी यावेळी दिले. बाजार समितीतील भूखंडांवर अतिक्रमणे करत इमारती बांधून त्यांनी मोठ्या प्रमाणावर मलीदा खाल्ला. कांदा ग्रेडींग शेडच्या जागेवर गाळे बांधून ते ३० ते ३५ लाखांना विकले मात्र पावत्या अवघ्या ५ लाखांच्या केल्या. यातून संस्थेचा काडीमात्र फायदा न होता त्यांनी त्यांचे घर भरले असल्याचा आरोपही यावेळी प्रा. गाडे यांनी केला.
यावेळी कर्डिले यांचे पुतणे संदीप कर्डिले हेही उपस्थित होते व त्यांनी महाआघाडीकडून उमेदवारी करणार असल्याचे जाहीर केले. महाआघाडीत काम करण्यास स्वातंत्र्य आहे. तसे स्वातंत्र्य तिकडे नव्हते. तिथे सर्वांना दबावाखालीच काम करावे लागते. म्हणून महाआघाडीकडे आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बाळासाहेब हराळ यांनी कर्डिले यांच्याकडून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांवर दडपशाही करत त्यांना अर्ज मागे घेण्यासाठी भाग पाडले जात असल्याचा आरोप केला.
प्रताप शेळके म्हणाले, मागील निवडणुकीत महाआघाडीचा निसटता पराभव झाला होता मात्र यावेळी महाआघाडी पूर्ण ताकदीने निवडणुक मैदानात उतरली असून कर्डिले व त्यांच्या कंपूला घरी पाठवणारच असे ते म्हणाले.