अहमदनगर : शेवगावमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणुकीत दगडफेकीची घटना घडली. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. जमावाला पांगविण्यास पोलिसांना यश आले आहे. सर्वत्र मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांना शांततेचं आवाहन करण्यात येत आहे. तर दगडफेक करणाऱ्यांचा शोध सुरू आहे.
शेवगावमध्ये दगडफेक, तोडफोड, जाळपोळ सुरू असताना या दंगलीत शेवगाव पोलीस ठाण्याचे चार पोलीस जखमी झाल्याचे कळते आहे. अशा परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी आटोकाट प्रयत्न केला. पाथर्डी, नेवासा येथील अतिरिक्त कुमक दाखल होईपर्यंत शेवगाव पोलिसांनी खिंड लढवली. छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव निमित्ताने निघालेली मिरवणूक येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दाखल झाल्यावर हा प्रकार घडला आहे. अहमदनगरहून शेवगावला मोठा बंदोबस्त पाठविण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत






