शिर्डीच्या साईबाबा प्रसादालयात, आषाढी एकादशीसाठी १२ टन साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद

0
30

आषाढी एकादशी उपवासा निमित्त शिर्डीच्या श्री साईबाबा प्रसादालयात ६६ पोते साबुदाणा खिचडी महाप्रसादाचे वाटप

प्रतिनिधी : विक्रम बनकर
शिर्डी : श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने आषाढी एकादशी हा स्‍थानिक उत्‍सव म्‍हणून साजरा करण्‍यात आला असून या निमित्‍ताने भाविकांसाठी श्री साईप्रसादालयात साबुदाणा खिचडी महाप्रसादाचे आयोजन करण्‍यात आले होते. या निमित्‍ताने श्रींचे समाधी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्‍यात आली होती. आषाढ शु ।।११ शके १९४५ हा दिवस आषाढी एकादशी म्‍हणून ओळखली जाते. या दिवसाचे महत्‍व लक्षात घेवुन संस्‍थानच्‍या वतीने आषाढी एकादशी हा स्‍थानिक उत्‍सव म्‍हणून साजरा करण्‍यात येतो. या निमित्‍ताने संस्‍थानच्‍या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात येते. यामध्‍ये रात्रौ ८ ते ९ यावेळेत कीर्तन कार्यक्रम समाधी मंदिराच्‍या समोरील स्‍टेजवर संपन्‍न झाला. तसेच रात्रौ ९.१५ वाजता श्रींचे पालखीची शिर्डी गावातुन मिरवणुक काढण्‍यात आली. यावेळी संस्‍थानचे अध्‍यक्ष सदस्‍य, अधिकारी, मंदिर पुजारी, कर्मचारी, शिर्डी ग्रामस्‍थ व साईभक्‍त मोठया प्रमाणात सहभागी झाले होते. पालखी समाधी मंदिरात परत आल्‍यानंतर रात्रौ १०.०० वाजता श्रींची शेजारती करण्‍यात आली. आषाढी एकादशी निमित्‍त संस्‍थानच्‍या वतीने श्रीसाई प्रसादालयात साबुदाणा खिचडी महाप्रसादाचे आयोजन करण्‍यात आले होते. संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांनी स्‍वतः साई प्रसादलयात पहाणी केली व साईभक्‍तांशी संवाद साधला. श्री साईप्रसादालयात सुमारे ६५ हजार भाविकांनी या खिचडी महाप्रसादाचा लाभ घेतला. याकरीता संस्‍थानच्‍या वतीने सुमारे ६६ पोते साबुदाणा, ४३ पोते शेंगादाणे, ८४५ किलो तुप व सुमारे २१४० किलो बटाटे आदि साहित्‍यांचा वापर करण्‍यात आला. तसेच साई सत्‍यणारायन पुजेलाही शि-याचा प्रसाद न करता, त्‍याऐवजी भगरीचा शिरा प्रसाद करण्‍यात आला. तसेच आषाढी एकादशी निमित्‍ताने जळगांव येथील देणगीदार साईभक्‍त श्री.रविंद्र बारी यांचेकडून श्री साईबाबा समाधी मंदिरात, फुलांची आकर्षक सजावट करण्‍यात आली.