नगर तालुक्यातील एका गावातून बळजबरीने पळवून नेलेल्या १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला शोधण्यात नगर तालुका पोलिसांच्या पथकाला यश आले असून पोलिसांनी त्या मुलीसह तिला पळवून नेणाऱ्या आरोपीला गुजरात राज्यातील बावला (जि. अहमदाबाद) येथे पकडले आहे. सागर रमेश मुदळकर (वय २५, रा. बाबुर्डी घुमट, ता.नगर)असे या आरोपीचे नाव आहे.
नगर तालुक्यातील एका गावातून दि.५ जानेवारी रोजी सकाळी ७ ते दुपारी १ या कालावधीत १७ वर्ष वयाच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून घरातून पळवून नेले होते. तिचा दिवसभर शोध घेवूनही ती मिळून न आल्याने तिच्या वडिलांनी रात्री उशिरा नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या फिर्यादी वरून पोलिसांनी प्रारंभी अज्ञात व्यक्ती विरुद्ध भा.दं.वि.३६३ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक युवराज चव्हाण हे करीत होते. तांत्रिक तपासात त्या मुलीसह आरोपी गुजरात राज्यात असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे प्रभारी स.पो.नि. नितीन रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी उपनिरीक्षक युवराज चव्हाण, पोलिस अंमलदार राजु खेडकर, संभाजी बोराडे, विक्रांत भालसिंग यांचे पथक गुजरातला गेले. तेथे त्यांनी या दोघांना शोधून काढत ताब्यात घेवून नगरला आणले. त्यानंतर पिडीत मुलीने दिलेल्या जबाबावरून आरोपी सागर याच्यावर अत्याचारासह पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






