शिक्षण क्षेत्रात खळबळ… मुख्याध्यापकाचा त्रास… जिल्हा परिषद महिला शिक्षिकेची आत्महत्या…

0
1928

मुख्याध्यापकाच्या जाचाला कंटाळून येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका रूपाली अशोक नेवसे (रा.शिक्षक कॉलनी, कर्जत) यांनी मंगळवारी सायंकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी मुख्याध्यापक संतोषकुमार किसन खंडागळे (रा.शारदानगरी,कर्जत) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत शिक्षिका रुपाली यांचे पती अशोक नामदेव नेवसे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की. त्यांची पत्नी रूपाली कर्जत शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. एप्रिल महिन्यापासून त्या सतत काळजीत असल्याने विचारणा केली असता त्यांनी सांगीतले की, शाळेतील मुख्याध्यापक संतोषकुमार किसन खंडागळे हे मैत्रीचा गैरफायदा घेऊन रात्री बेरात्री सतत फोन करून ‘तू मला आवडतेस, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू माझीच आहेस असे वारंवार म्हणुन मानसिक त्रास देत आहे.
जर ही गोष्ट कोणाला सांगितले तर तुझ्या नवर्‍याला मारून टाकीन, तसेच तुझे फोटो सोशल मीडियावर फोटो प्रसारित करून तुझी बदनामी करेल अशी धमकी देत होता. यानंतर मी तसेच नातेवाईकांनी संतोष कुमार खंडागळे यास याबाबत समक्ष भेटून अशा पद्धतीने त्रास देऊ नका असे सांगितले होते.
मंगळवारी (दि. 12) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुलगा प्रथमेश याचा फोन आला व त्याने आई ने बेडरूम मध्ये गळफास घेतला असून बेडरूमचा दरवाजा बंद असल्याचे सांगितले. त्यानंतर शेजार्‍यांच्या मदतीने बेडरूमचा दरवाजा तोडून पत्नीला खाली उतरवले. तातडीने उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेलो. परंतु डॉक्टरांनी तपासणी करून रूपाली ही मयत झाल्याचे सांगितल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.