आसाममध्ये भाजप सरकारचे पहिले वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त येथे मंगळवारी झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा बोलत होते. या सभेस गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. बोलण्याच्या ओघात शर्मानी मार्गदर्शक आणि प्रेरक ‘पंतप्रधान’ अमित शहा आणि प्रिय ‘गृहमंत्री’ नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्याची १५ सेकंदांची चित्रफीत विरोधी पक्षांतर्फे सर्वदूर पाठवली जात असून, त्यात पदांची अदलाबदल करण्यामागचा ‘सुप्त हेतू्’ काय आहे, असा प्रश्न विचारला जात आहे. काँग्रेसने ही चित्रफीत ‘ट्विटर’सारख्या समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केली असून, त्यात विचारले आहे, की जेव्हा सर्बानंद सोनोवाल हे मुख्यमंत्रिपदी होते तेव्हा अनेक प्रसंगी खासदार पल्लब लोचन दास यांनी तत्कालीन मंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांचा मुख्यमंत्री असा जाहीर उल्लेख केला होता. त्यानुसार भाजपने नरेंद्र मोदींऐवजी पुढचे पंतप्रधान बदलण्याचे ठरवले आहे काय? किंवा अमित शहा यांना पंतप्रधान म्हणून समोर आणण्याची मोहीम सुरू केली आहे काय? असेही काँग्रेसने ‘ट्विटर’द्वारे विचारले आहे.