नगर – शहरातील मुकुंदनगर – फकीरवाडा भागात रविवारी रात्री काढण्यात आलेल्या संदल उरूस मिरवणूकीत काही समाजकंटकांनी औरंगजेबाची प्रतिमा असलेले फलक झळकावून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सदरचा प्रकार अत्यंत गंभीर व संतापजनक आहे. नगर शहरात जातीय तेढ निर्माण करून शांतता भंग करण्याचा हा डाव आहे. संबंधित समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी, त्यांना अटक करून जिल्ह्यातून तडीपार करावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अभय आगरकर यांनी केली आहे.
शहरात सातत्याने जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाजकंटक करत आहेत. काही जण सातत्याने असे प्रकार करून तणाव निर्माण होईल, अशी कृत्ये करत आहेत. अशा प्रवृत्तींना वेळीच पायबंद घालण्यासाठी कठोर कारवाई करण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अशा प्रकारे औरंग्याच्या उदो उदो करण्याचा प्रकार कदापि खपवून घेतला जाणार नाही. असे प्रकार करणाऱ्यांना पोलिस प्रशासनाने तत्काळ अटक करावी. या प्रकारातून तणाव निर्माण होऊन, पुन्हा एखादी मोठी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या समाजकंटकांना जिल्ह्यातून तडीपार करावे. ज्या संघटना अशा मिरवणुका काढून तेढ निर्माण करत असतील, त्यांच्यावर बंदी घालावी, त्यांना परवानग्या देऊ नये, अशी मागणीही आगरकर यांनी केली आहे. यासंदर्भात लवकरच पोलिस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचेही आगरकर यांनी सांगितले.