१९ वर्षांखालील महिला टी२० विश्वचषक २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना खेळला गेला त्यात टीम इंडियाने इंग्लंडला अक्षरशः लोळवत ७ गडी राखून धूळ चारली आणि पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरले. सेनवेस पार्क येथे पार पडलेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडला धोबीपछाड देत अंडर-१९ विश्वचषकाची पहिली आवृत्ती आपल्या नावावर केली.
या पहिल्यावहिल्या विजयासाठी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघासाठी तब्बल ५ कोटी रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. त्यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणतात की, “भारतातील महिला क्रिकेटची प्रगती होत आहे आणि या विश्वचषक विजयाने महिला क्रिकेटचा दर्जा काही अंशांनी उंचावला आहे. संपूर्ण टीम आणि सपोर्ट स्टाफसाठी बक्षीस रक्कम म्हणून ५ कोटी रुपये जाहीर करताना मला आनंद होत आहे. हे निश्चितच नव्या वाटा निर्माण करणारे वर्ष आहे.”