महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी बंडखोरी करून भाजपशी हातमिळवणी करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खोचक टोला हाणला आहे. अजित पवार एक वेगळे व्यक्तिमत्व आहे. ते कायम उपमुख्यमंत्री बनण्यासाठी तयार असतात. यामुळे मला कधी कधी त्यांची दया येते, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवरील त्यांच्या वर्चस्वाचे कौतुकही केले.
भगतसिंह कोश्यारी यांना यावेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधी संबंधी प्रश्न केला असता त्यांनी अजित पवारांना खोचक टोला हाणला. मला अजित पवारांची दया येते, असे ते म्हणाले.
अजित पवार महाराष्ट्रातील एक हुशार राजकारणी आहेत. आपल्या राज्यातही असाच एक मोठा नेता आहे, तो कितीही वेळा पराभूत झाला तरी हार मानत नाही. त्यानुसार अजित पवार यांना कितीही वेळा उपमुख्यमंत्री होण्यासाठी सांगितले तरी ते त्यासाठी कायम तयार असतात. कधी कधी मला त्यांची दया येते, असे भगतसिंह कोश्यारी उपरोधिकपणे हसत म्हणाले.
यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वगुणांचे कौतुकही केले. अजित पवार एक छान व हुशार माणूस. त्याचा मास बेस मोठा आहे. संघटनेवर मोठी पकड आहे. बहुतांश आमदार-खासदार त्यांच्याच बाजूने आहेत. अजित यांचे संघटन कौशल्य, नेतृत्व व पक्षातील स्थान मोठे आहे, असे ते म्हणाले.