भाऊसाहेब वाकचौरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला. यावेळी खासदार विनायक राऊत आणि ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्या ‘मतोश्री’ या निवासस्थानी वाकचौरे यांनी हाती शिवबंधन बांधलं. यावेळी वाकचौरे यांच्याबरोबर शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर वाकचौरे हे काँग्रेस, भाजप असा प्रवास करून पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत परतले आहेत.
भाऊसाहेब वाकचौरे हे २००९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर शिर्डीतून खासदार झाले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकीटावर शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढले. परंतु त्यावेळी शिवसेनेच्या सदाशिव लोखंडे यांनी वाकचौरे यांचा दोन लाख मतांनी पराभव केला होता. आता वाकचौरे यांची घरवापसी झाली आहे. त्यामुळे आगामी लोकसभेला भाऊसाहेब वाकचौरे हे ठाकरे गटाच्या तिकीटावर पुन्हा एकदा शिर्डीतून निवडणूक लढतील असं बोललं जात आहे.
शिर्डी लोकसभेचे माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी आज त्यांच्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला, पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. pic.twitter.com/Piz96GlJHO
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) August 23, 2023