मणिपूरचा असंतोष, मोदींमध्ये हिंमतच नाही, भाजपच्या बड्या नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी

0
33

मणिपूरमध्ये अंतर्गत सामाजिक असंतोषामुळे गेल्या तीन महिन्यांपासून जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातून विरोधकांनी मोदी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असतानाच खुद्द भाजपाच्या एका नेत्यानं मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर आणि मणिपूर घटनेच्या अयोग्य हाताळणीवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामाही दिला आहे. भाजपा नेते व बिहारमधील पक्षाचे प्रवक्ते विनोद शर्मा यांनी गुरुवारी पक्षाचा राजीनामा दिला. “मी फार जड अंत:करणाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपल्या भावना कळवल्या आहेत. मणिपूरसारखी घटना आधी कधीही कुठे घडली नाही. पण तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही झोपेतच आहेत. मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना पदावरून हटवण्याची मोदींमध्ये हिंमत नाही”, अशी संतप्त प्रतिक्रिया विनोद शर्मा यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करतानाच विनोद शर्मा यांनी आपल्या पक्षालाही लक्ष्य केलं आहे. “भाजपा नारी शक्ती, बेटी बचाओ, हिंदू राष्ट्र, सनातन धर्माच्या गोष्टी करते. हा आपला सनातन धर्म आहे का? एक माणूस म्हणून मी हे सगळं सहन करू शकत नाही. त्यामुळे मी अन्यायाविरोधात बोलत आहे”, असं विनोद शर्मा म्हणाले.