Home नगर शहर नगर जिल्ह्यातील चारा परजिल्ह्यात नेण्यावर बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नगर जिल्ह्यातील चारा परजिल्ह्यात नेण्यावर बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

0
23

नगर : जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा मुरघास, टोटल मिक्स रेशन (टीएमआर) यांची इतर जिल्ह्यात वाहतूक करण्यास मनाई करणारा आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी आज, शुक्रवारी जारी केला. पुढील दोन महिन्यांच्या कालावधीसाठी हा आदेश लागू राहील.

जिल्ह्यात भविष्यात चारा टंचाई निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून हा आदेश जारी केल्याचे समजले. फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार हा आदेश जारी करण्यात आला आहे. राज्यात सर्वाधिक मुरघास उत्पादन करणाऱ्या कंपन्या नगर जिल्ह्यात आहेत. मका व चाऱ्यापासून मुरघास तयार केला जातो. ही पिके जिल्ह्यात पिकवली जातात व त्यापासून तयार केलेला मुरघास परजिल्ह्यात विकला जातो. जिल्ह्यात सुमारे ६ लाख टन मुरघास उत्पादन केला जातो.

हिरवा व कोरडा चारा, खनिज मिश्रण व पशुखाद्य यांच्या मिश्रणातून टीएमआर तयार केला जातो. जिल्ह्यात सध्या चारा टंचाईची परिस्थिती नसली तरी भविष्यात ती उद्भवू नये यासाठी हा प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे.