अहमदनगर दर्शना पवार हिचा खून… हांडोरेच्या मागावर पोलीस

0
20

पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी रविवारी सकाळी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिचा मृतदेह सापडला. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याची ओळख पटवणे अवघड जात होते. या प्रकरणात पोलिसांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली होती. पोलिसांची ही शक्यता खरी असल्याचे पोस्टमॉर्टम अहवालातून बाहेर आले आहे. आता या प्रकरणात संशयाची सर्व सुई तिचा मित्र राहुल दत्तात्रय हांडोरे याच्याकडे जात आहे. त्याच्यासंदर्भात बरीच माहिती पोलिसांनी जमा केली आहे.
कोपरगाव येथील दर्शना पवार हिचा मित्र राहुल हांडोरे याचा शोध पुणे पोलीस घेत आहेत. घटनेनंतर त्याचे शेवटचं लोकेशन पुण्यातील कात्रज होते. त्यानंतर दोन दिवसांनी तो बेपत्ता झाला. पुणे शहरातून तो सरळ नवी दिल्लीला गेल्याचे स्पष्ट होत आहे. कारण त्यानंतर दोन दिवसांनी नवी दिल्लीतील एटीएम सेंटरवरुन त्याने पैसे काढले. तसेच त्याच्या मोबाईलवरुन रविवारी रात्री त्याने नातेवाईकांशी संवाद साधला होता. यावेळी त्याने सांगितले की, एका मित्राशी वाद झाल्यानं पुणे सोडले आहे. इतके बोलून त्याने फोन कट केला होता. आता त्याचा फोनचे लोकेशन कोलकाता दिसत आहे.