राजधानी दिल्लीत विधानसभेच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. आम आदमी पार्टी सलग चोथ्यांदा सरकार येण्यासाठी जंगजंग पछाडत आहे.याच दरम्यान
दिल्ली आणि हरियाणामधील यमुना नदीचा संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे. ‘आप’ प्रमुख माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हरियाणाच्या भाजपा सरकारवर नदीत विषप्रयोग केल्याचा आरोप केला आहे. दिल्लीत अराजकता निर्माण करण्यासाठी हे केले गेले आहे. जेणेकरून दिल्लीतील लोक मरतील आणि याचा दोष ‘आप’वर येईल, असे केजरीवाल म्हणाले. ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी हरियाणा सरकारवर हे आरोप करण्यात आले आहेत.
केजरीवाल यांनी पत्रकारांना सांगितले की, भाजपाने इतिहासात कधीही केले नसेल असे काहीतरी केले आहे. त्यांनी हरियाणात सत्तेवर असलेल्या भाजपावर राज्यातून वाहणाऱ्या यमुना नदीत विषारी पदार्थ टाकल्याचा आरोप केला. “दिल्लीतील लोकांना पिण्याचे पाणी हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधून मिळते. हरियाणा सरकारने यमुनेतून दिल्लीला येणाऱ्या पाण्यात विष मिसळून ते इथे पाठवले आहे. हे आपल्या दिल्ली जल बोर्डाच्या अभियंत्यांच्या सतर्कतेमुळे लक्षात आले आहे आणि हे पाणी सीमेवरच अडवले आहे,” असे केजरीवाल यांनी पत्रकारांना सांगितले.
“पाणी दिल्ली सीमेवर थांबवले गेले. आम्ही ते शहरात येऊ दिले नाही. अशा गोष्टी आपण युद्धात पाहिल्या आहेत, पण आज भाजपाने दिल्लीच्या पाणीपुरवठ्यात विष मिसळून जे केले, ते दिल्लीत अराजक माजवण्याचा प्रयत्न आहे. याचा दोष ‘आप’वर यावा असा त्यांचा उद्देश होता, असा दावा केजरीवाल यांनी केला आहे.
दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री आतिशी यांनीही हरियाणाच्या कृतीचा उल्लेख ‘वॉटर टेररिझम’ असा केला आहे. यमुनेमध्ये अमोनियाची उच्च पातळी ही एक समस्या आहे, कारण दिल्ली प्रशासन शहरातील नागरिकांसाठी स्वच्छ आणि सतत पाणी पुरवठ्याची हमी देण्याचे काम करत आहे. काही अंदाजानुसार, दिल्लीला दररोज ३,००० दशलक्ष लिटरपेक्षा जास्त पाणी लागते, परंतु सरासरी पुरवठा फक्त २,००० दशलक्ष लिटरपेक्षा जास्त आहे. ‘आप’चे सांगणे आहे की, अमोनियाच्या पातळीमुळे आणखी तूट निर्माण झाली आहे.






