बीडमधील मस्साजोग सरपंच देशमुख हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. देशमुख यांची हत्या होऊन आता ५१ दिवस झाले आहेत. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पुरावे सादर केले असल्याचा दावा केला होता. तसेच आज धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर गेले असल्यामुळे ते राजीनामा देतील, अशी जोरदार चर्चा होती. यावर आता धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दिल्ली येथे पत्रकारांशी बोलत असताना धनंजय मुंडे राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी दोषी वाटत असेल तर त्यांनी माझा राजीनामा मागावा. मी राजीनामा देण्यास तयार आहे. मी दोषी आहे की नाही, हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगू शकतील. ५१ दिवसांपासून मला लक्ष्य केले जात आहे.” नैतिकतेच्या मुद्द्यावर स्वतःहून राजीनामा देणार का? असा प्रश्नही यावेळी मुंडे यांना विचारण्यात आला. त्यावर मुंडे म्हणाले, “माझी नैतिकता माझ्या लोकांबाबत प्रामाणिक आहे. मी जे बोलतो, ते अतिशय प्रामाणिकपणे बोलतो. मी नैतिकदृष्ट्या दोषी नाही, असे मला वाटते. जर दोषी असेल तर माझे वरिष्ठ मला तसे सांगतील.”