अहमदनगरमध्ये विशाल गणपती मंदिरासह १६ मंदिरात वस्त्र संहिता लागू…

0
24

राज्यात नागपूर, अमरावतीनंतर आता नगर शहरातील ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरासह १६ मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघ व संबंधित मंदिरांच्या विश्वस्तांनी घेतला आहे. नगर येथील पत्रकार परिषदेत महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी ही माहिती दिली. येत्या महिनाभरात जिल्ह्यातील ५०० मंदिरात व दोन महिन्यांत संपूर्ण जिल्ह्यातील मंदिरात ही वस्त्रसंहिता लागू करण्याचे महासंघाचे प्रयत्न आहे. त्यासाठी मंदिर रक्षा समितीची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मंदिराचे पावित्र्य, मांगल्य, शिष्टाचार संस्कृती जपण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे घनवट म्हणाले. या वेळी मंदिरांचे विश्वस्त अभय आगरकर, पंडितराव खरपुडे, प्रतिभा भोंग, ॲड. पंकज खराडे, प्रा. माणिक विधाते, बापू ठाणगे, मिलिंद चवंडके, ॲड. अभिषेक भगत आदी उपस्थित होते. राज्य सरकारने सन २०२० मध्ये सरकारी कार्यालयातून वस्त्रसंहिता लागू केली. तसेच देशातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी अन्य प्रार्थनास्थळे, खाजगी आस्थापना, शाळा-महाविद्यालय, पोलिस आदी क्षेत्रात वस्त्रसंहिता लागू आहे. तसेच मंदिरांमध्येही ती लागू असावी, असा उद्देश आहे. १६ मंदिरांची नावे : श्री विशाल गणपती मंदिर (माळीवाडा), भवानी माता मंदिर (बुणऱ्हानगर), शनि मारुती मंदिर (दिल्लीगेट), शनि मारुती मंदिर (माळीवाडा), शनि मारुती मंदिर (झेंडीगेट), गणेश राधाकृष्ण मंदिर (मार्केट यार्ड), विठ्ठल मंदिर (पाईपलाईन रस्ता), दत्त मंदिर (पाईपलाईन रस्ता), श्रीराम मंदिर (पवननगर, सावेडी), भवानी माता मंदिर (सबजेल, चौक) रेणुकामाता मंदिर (केडगाव), श्रीराम मंदिर (वडगाव गुप्ता), पावन हनुमान मंदिर (वडगाव गुप्ता), संत बाबाजी मंदिर (वडगाव गुप्ता), साईबाबा मंदिर (केडगाव), खाकीदास बाबा मंदिर (लालटाकी) या १६ मंदिरांच्या विश्वस्तांनी मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू केली आहे. त्याचे फलकही मंदिरांसमोर लावण्यात आले.

फाटकी जीन्स, स्कर्ट, घातल्यास विनम्र नकार भाविकांनी अंगप्रदर्शन करणारे, उत्तेजक तोकडे असभ्य अशोभनीय (फाटकी जीन्स, स्कर्ट) कपडे घालून मंदिरात प्रवेश करू नये.