कर्जत तालुक्यातील नांदगाव शिवारामध्ये 23 डिसेंबरला कुकडी कालव्यामध्ये मृतदेह आढळला होता. हा खून प्रेम संबंधातून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून पोलिसांनी एका महिलेसह चौघांना मंगळवारी (24 डिसेंबर) अटक केली. बीड येथील रणजीत सुनील गिरी (वय 23) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी संतोष बाबुराव जाधव (रा.खांडवी, ता. कर्जत), ऋषिकेश रवी बोरकर (रा.वडझिरे, ता. पारनेर), उद्धव उर्फ संतोष मांडगे (रा. आढळगाव, ता. श्रीगोंदा) आणि खांडवी येथील महिलेला अटक करण्यात आली आहे.
घटनेची हकीकत अशी, कर्जत तालुक्यातील नांदगाव शिवारामध्ये 23 डिसेंबरला कुकडी कालव्याच्या पाण्यावर मतदेह तरंगत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाचे कर्जत येथे उपजिल्हा रुग्णालयात शव विच्छेदन करण्यात आले. मयत युवकाच्या गळ्याभोवती जखम व फाशी दिल्यासारखा व्रण आढळला. जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट दिली. बीड येथे राहणारा रणजीत सुनील गिरी हा हॉटेल आणि ढाब्यावर आचारी म्हणून काम करत होता. मात्र मागील अनेक दिवसांपासून तो गायब होता. घरच्यांची संपर्क केल्यावर फोनवरून तो मी व्यवस्थित आहे असे सांगत होता. त्यामुळे तो कुठेतरी ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये काम करत असेल असे घरच्यांना वाटत होते.
मयत रणजीत गिरी याच्यावर मिरजगाव पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. जानेवारीपासून तो कर्जत येथील पोलीस कोठडीतच होता. तीन महिन्यांपूर्वी त्याची सुटका झाली होती. सुटका झाल्यानंतर देखील मयत रणजीत गिरी बीडला न जाता या परिसरामध्ये राहत होता. दरम्यान, मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलीस निरीक्षक मारुती मुळूक यांनी तात्काळ पूर्वीच्या असलेल्या गुन्ह्याशी काही धागेदोरे जुळतात का? याचा अंदाज घेत यातील काहीजणांना ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर यातील आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
रणजीत हा संबंधित मुलीचे लग्न झाल्यानंतर देखील तिच्याशी फोनवरून संपर्क करत होता. हे त्या मुलीच्या पतीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही बाब मुलीच्या आई-वडिलांना सांगितली. त्यांनी मुलीस अनेकवेळा समजावून सांगितले. मात्र काही बदल होत नसल्यामुळे अखेर त्यांनी रणजीत गिरी यास संपवण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यानुसार या मुलीच्या आईने सर्व नियोजन केले आणि जावई, मुलीचे वडील आणि त्यांचे ओळखीचे एक जण या सर्वांनी मिळून रणजीत यास गोड बोलून विश्वासात घेतले. त्याला आढळगाव परिसरामध्ये गाडीमध्ये आणतानाच मारहाण केली. यानंतर त्याचा दोरीने गळा आवळला आणि खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह कुकडी कालव्याच्या पाण्यामध्ये फेकून दिला. हा खून प्रेम संबंधातून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.