पालकमंत्री विखे पाटील यांनी साधला नेवासा जळीतग्रस्त व्यापार्‍यांशी संवाद,तहसीलदारांना आदेश

0
15

नेवासा शहरात शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत दुकाने जळाल्याच्या घटनास्थळी जाऊन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी केली. यावेळी जळीतग्रस्त व्यापार्‍यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. पालकमंत्र्यांनी व्यापार्‍यांशी संवाद साधत तहसीलदारांना सोमवारी तातडीने बैठक घेऊन दुकानदारांना नगरपंचायतीच्या गाळ्यांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात गाळे खुले करून देण्याबाबत मार्ग काढण्याचा आदेश दिला.

नेवाशातील दुकान गाळे जळून खाक झाल्याच्या दुर्घटनेत सुमारे एक कोटी पंधरा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा केलेला असून महसूल प्रशासनाला पंचनाम्यानुसार मदत करण्याचे आदेश दिले. आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून आम्हास उदरनिर्वाह करण्याचे साधन राहिलेले नाही. तरी तलाठी व मंडलाधिकारी यांनी केलेला स्पॉट पंचनामा ग्राह्य धरण्यात यावा व लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी व आम्हास उदरनिर्वाह करण्यास मदत मिळावी, असे निवेदन नुकसानग्रस्त व्यापारी सचिन बोरुडे, रिजवान सय्यद, महेश शेजूळ, विनायक तंटक, अफरोज पठाण, जालिंदर शेंडे, गणेश व्यवहारे, लक्ष्मण रासने, नरहरी शेजूळ, राजू चांदणे, राम शेजूळ, प्रकाश साळुंके यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना दिले.

तहसीलदार संजय बिरादार यांना आगीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याबाबत माहिती घेऊन जळीत झालेल्या दुकानदारांना शासनाची जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आगीत झालेल्या नुकसानीमुळे दुकानदारांचा उघड्यावर पडलेला संसार पुन्हा एकदा उभा राहण्यासाठी नेवासा नगरपंचायतीने बांधलेल्या गाळ्यांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात व्यापार्‍यांना गाळे खुले करून देण्याबाबत तातडीने सोमवारी बैठक घेऊन मार्ग काढण्याचा आदेश यावेळी ना. विखे यांनी दिला. जिल्हाधिकारी व संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेऊन नुकसानीबाबत निर्णय घेण्यात येईल व त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी व्यापारी संकुल उभारण्यासाठी नगररचना विभागाकडून तांत्रिक मार्गदर्शन घेऊन व्यापारी संकुलाचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन यावेळी पालकमंत्री यांनी दिले.