कर्जत जामखेड तालुक्यात पाणंद रस्त्यांच्या कामांत अपहार, सरकारने दिले चौकशीचे आदेश

0
444

पालकमंत्री पाणंद रस्ते योजना व रोजगार हमी योजनेंतर्गत पाणंद रस्ते कामात कर्जत-जामखेड तालुक्यात 20 कोटी रूपयांचा अपहार झाला असून, याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांनी चार सदस्यीय समितीमार्फत सखोल चौकशी करून एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याची माहिती आ. राम शिंदे यांनी दिली.

प्रशासकीय विहीत प्रक्रिया राबवली गेली नाही. रस्त्याच्या दर्जाबाबत कोणत्याही सबंधीत अभियंत्याच्या देखरेखीखाली काम झालेले नाही. झालेल्या कामाचे मोजमाप अंदाजे करून, ठेकेदारांना पैसे अदा करण्यात आले आहेत. केवळ पैसे मिळवण्याच्या उद्देशातून करण्यात आलेली ही कामे अत्यंत निकृष्ठ दर्जाची करण्यात आली आहेत. तर काही ठिकाणी रस्तेच न करता, कामे कागदावर दाखवून बील काढण्याचा प्रकार घडला आहे. आ. शिंदे यांनी ही बाब गांभीर्याने घेत पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्र उपस्थित केला. याप्रकरणी आ.शिंदे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस व रोजगार हमी मंत्री भुमरे यांच्याकडे तक्रार करून, चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार याची दखल घेत मंत्री भुमरे यांनी चौकशी समितीद्वारे एक महिन्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.