राज्य सरकारचा मोठा निर्णय ,लाडकी बहीण योजनेतून ५ लाख लाभार्थ्यांना वगळले

0
43

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी लाभदायक ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या बदललेल्या निकषांची माहिती एक्सवर दिली आहे. या नव्या निकषांनुसार या योजनेतून पाच लाख महिला आता अपात्र ठरणार आहेत. जुलै २०२४ मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेतील लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये थेट खात्यात दिले जात होते. आतापर्यंत योजनेचे सात हप्ते वितरीत करण्यात आले आहेत. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे.

अपात्र ठरविण्यात आलेल्या निकषांप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या २,३०,००० महिलांना वगळण्यात आले आहे. तसेच वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या १,१०,००० महिलांना योजनेतून अपात्र ठरविले गेले आहे. कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या १,६०,००० महिला आहेत. यानुसार एकूण पाच लाख महिला आता अपात्र ठरल्या आहेत.

https://x.com/iAditiTatkare/status/1887813140886282672?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1887813140886282672%7Ctwgr%5Efeca7a0f8fbe7274e86fd5db1d76442f484083f1%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmaharashtra%2Ffive-lakh-women-beneficiary-excluded-from-ladki-bahin-scheme-says-women-and-child-development-minister-aditi-tatkare-kvg-85-4876165%2F&mx=2

विधानसभा निवडणुकांआधी जाहीर केलेल्या अनेक योजनांचा मोठा आर्थिक ताण शासकीय तिजोरीवर येत असल्याची ओरड होत होती. यासाठी इतर योजनांचा निधी कमी केला असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा या दोन योजना बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.