गट नेता बदल…शिवसेना लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयावर नाराज…जारी केला व्हिडिओ

0
737

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांनी बंडखोर गटाच्या मागणीवर घेतलेल्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेत गंभीर आरोप केले आहेत. “शिवसेनेच्या बंडखोर गटाने १९ जुलैला त्यांचा गटनेतेपदाबाबत मागणी केली, मात्र लोकसभा अध्यक्षांनी १८ जुलैलाच हा निर्णय घेतला. त्यामुळे बंडखोरांना निवडण्याचा निर्णय आधीच झाला होता,” असा आरोप विनायक राऊत यांनी केला. तसेच लोकसभा अध्यक्षांनी आमच्या पत्राची दखल न घेता, नैसर्गिक न्यायाचं तत्व न पाळता निर्णय घेतल्याचंही राऊत यांनी म्हटलं. ते गुरुवारी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

विनायक राऊत म्हणाले, “आम्ही ६ जुलैलाच लोकसभा अध्यक्ष आणि संसदीय कामकाज मंत्र्यांना पत्र दिलं होतं. त्यानंतर १८ जुलैला रात्री साडेआठ वाजता लोकसभा अध्यक्षांच्या घरी जाऊन शिवसेनेच्या गटनेतेपदावर कुणी दावा केल्यास आम्हाला आमचं म्हणणं मांडण्याची संधी द्या अशी मागणी केली. पुन्हा १९ जुलैला समक्ष भेटून लोकसभा अध्यक्षांना त्याबाबत पत्र दिलं. मात्र, त्यांनी आमच्या पत्रांची दखल न घेता अचानक लोकसभेतील शिवसेना गटनेते बदलले आहेत. राहुल शेवाळे यांचं नाव लोकसभा संकेतस्थळावर दाखवलं जात आहे.”