पारनेर : पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजनेत पारनेर तालुक्यातही हेराफेरी झालेली आहे. या योजनेतील १५६ शेतकऱ्यांनी फळबागेची लागवड नसतानाही फळबागेचा विमा उतरविल्याचे, तर ६७ शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात लागवडीपेक्षा अधिक विमा घेतला असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे तालुक्यातील या २२३ शेतकऱ्यांचे विमा अर्ज रद्द करण्यात आले आहेत.पीक नसताना कांदा पिकाचा पीक विमा जिल्ह्यातील अनेक तालुक्यात उतरविल्याचे तपासणीत उघड झाले होते. त्यानंतर कृषी विभागाच्या वतीने फळबाग लागवडीचा विमा घेतलेल्या शेतकऱ्यांच्या फळबागांची तपासणी केली होती.
त्यातही प्रत्यक्षात लागवड नसताना फळबागेचा विमा उतरविणे, तसेच लागवडीपेक्षा अधिक क्षेत्राचा विमा उतरविल्याचे कृषी विभागाच्या तपासणी पथकास दिसून आले आहे. कृषी विभागाच्या तपासणी पथकाने प्रत्यक्षात स्थळ पाहणी केली असता तालुक्यातील १५६ शेतकऱ्यांनी फळबाग नसतानाही ७२.१९ हेक्टर क्षेत्रावरील फळबागेचा विमा उतरविला असल्याचे उघड झाले आहे.तसेच ६७ शेतकऱ्यांनी आपण लावलेल्या क्षेत्रापेक्षा ५२.९४ हेक्टर क्षेत्राचा अधिकचा विमा उतरविला असल्याचे तपासणीत उघड झाले आहे. त्यामुळे वरील शेतकऱ्यांचे बोगस क्षेत्राचा विमा मागणी अर्ज रद्द करण्यात आले आहेत.
पीक नसताना किंवा फळबाग नसताना विमा उतरवून त्याचा लाभ घेणे हे चुकीचे आहे. यात संबंधित शेतकरी सरकारची जाणीवपूर्वक फसवणूक करत आहे. वास्तविक पाहता ही फसवणूक म्हणजे मोठा गुन्हा आहे. त्यामुळे या पुढील काळात शेतकऱ्यांनी असा आपल्या पिकांचा किंवा फळबागेचा बोगस विमा उतरवू नये.
— गजानन घुले, कृषी तालुका कृषी अधिकारी, पारनेर.






