minister gadakh..मुळा एज्युकेशन सोसायटीतील कर्मचारी प्रतिक बाळासाहेब काळे आत्महत्या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात राज्याचे जलसंधारणमंत्री व शिवसेना नेते शंकरराव गडाख यांना जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.
प्रतिक काळे (वय २७) याने धनगरवाडी (ता. नगर) शिवारात २९ ऑटोबर २०२१ रोजी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली होती. प्रतिक हा मुळा एज्युकेशन सोसायटीमध्ये लिपीक म्हणून कार्यरत होता. त्याच्या आत्महत्येनंतर प्रतिकची बहीण प्रतीक्षा बाळासाहेब काळे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे. आरोपींमध्ये मंत्री शंकरराव गडाख यांचा समावेश नसला, तरी त्यांनी या प्रकरणामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
प्रतिक हा मुळा एज्युकेशन सोसायटीमध्ये काम करत असताना त्याच्या चांगल्या कामामुळे तो गडाख परिवाराच्या अत्यंत जवळ गेला होता. ही बाब खटकल्यामुळे प्रतिक याला त्याचे वरिष्ठ व सहकारी अशा सात जणांकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात होता. त्याने नोकरी सोडावी म्हणून त्याचा छळ करण्यात आला. त्यानंतर जबरदस्तीने त्याला राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले. या छळाला कंटाळूनच त्याने आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले होते.प्रतिकने आत्महत्या करण्यापूर्वी काही व्हिडिओ व ऑडिओ लिप सोशल मीडियात व्हायरल केल्या होत्या. यात मंत्री गडाख यांच्यासह परिवारातील सदस्यांची नावे घेतली होती. या प्रकरणात आरोपींमध्ये मंत्री शंकरराव गडाख यांचा समावेश नसला, तरी त्यांनी या प्रकरणामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. दि. २४ मार्चला या अर्जावर पहिली सुनावणी होऊन त्यानंतर २९ मार्च रोजी सुनावणी पार पडली. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. कापसे यांनी बाजू मांडत जामिनाला विरोध दर्शवला होता. गडाख यांच्यावतीने अॅड. अमित झिंजुर्डे यांनी बाजू मांडली. तपासी अधिकार्यांकडूनही म्हणणे सादर करण्यात आले होते. अतिरिक्त सत्र न्यायाधीश मिलिंद कुर्तडीकर यांनी दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकून मंत्री गडाख यांना २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलयावर अटकपूर्व जामीन मंजूर केला.






