दोन महसूल मंत्र्यांमधील फरक कामातून दाखवून देऊ – खा. सुजय विखे पाटील

0
1326

नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडेच महसूल तसेच पशुसंवर्धन खाते सोपविण्यात आले आहे. महसूल खाते त्यांना मिळाल्याने पुन्हा हे खाते अहमदनगर जिल्ह्यातच राहिले आहे. यापूर्वी संगमनेर मतदार संघातील बाळासाहेब थोरात यांच्याकडे हे खाते होते तर आता संगमनेरला लागूनच असलेल्या शिर्डी मतदार संघात हे खाते गेले आहे. मात्र, दोन्ही महसूल मंत्र्यात काय फरक असतो हे दाखवून देणार असल्याचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या 35 वर्षापासून राधाकृष्ण विखे-पाटील हे राजकीय क्षेत्रात आहेत. मात्र, पक्षातील अंतर्गत मतभेदानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला पण सरकार हे महाविकास आघाडीचे स्थापन झाले होते. अखेर शिंदे सरकारच्या काळात का होईना त्यांचे 35 वर्षातील योगदानाचे फलीत झाल्याचे सुजय विखे पाटील यांनी सांगितले आहे. तर मंत्रिपद देखील मागून नाही आणि खाते पक्षश्रेष्ठींच्या आदेशानेच मिळाले आहे. त्यामुळे त्यांचा विश्वास आणि जनतेची कामे हाच उद्देश राहणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले आहे. संवैधानिक दृष्टीकोनातून फार उच्च खात आहे. त्याचा सर्वसामान्य जनतेला कसा फायदा होईल यावरच लक्ष असणार असेही विखे पाटील म्हणाले आहेत.

गेल्या 35 वर्षाच्या काळात एवढा सन्मान मिळाला नाही तो भाजपाच्या काळात मिळाल्याचे डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले आहे. कार्यक्षमता ओळखून न्याय मिळालाच नाही. आता संधी मिळाली असून त्याचे सोने केले जाणार आहे. विकासकामावरुनच दोन महसुलमंत्र्यांमध्ये काय फरक असतो हे आम्ही दाखवून देऊ असे म्हणत त्यांनी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना टोला लगावला आहे.