आ.निलेश लंकेंची पुण्यातील उपोषण यशस्वी…मतदारसंघातील मोठा प्रश्न मार्गी

0
22

माझ्या पारनेर-नगर मतदारसंघातील ३० बंधाऱ्यांच्या कामांवरील स्थगिती उठविल्यानंतरही या कामांची निविदा प्रक्रिया राबविण्यात टाळाटाळ करणाऱ्या मृद व जलसंधारण विभागाच्या पुणे येथील कार्यालयासमोर आज उपोषण सुरू करताच सायंकाळी सर्व कामांची निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे लेखी आश्‍वासन मृद व जलसंधारण विभाागाचे अप्पर आयुक्त जलसंधारण तथा मुख्य अभियंता सुनील कुशेरे यांनी दिले. मंगळवारी या कामांच्या निविदा ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत.
पारनेर तालुक्यातील २१ तर नगर तालुक्यातील ९ बंधाऱ्यांच्या कामांना महाविकास आघाडीच्या काळात प्रशासकिय मान्यता देण्यात आली होती. एकूण २९ कोटी १९ लाख रूपये खर्चाच्या या कामांना राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर ८ जुलै रोजी स्थगिती देण्यात आली होती.
मी पाठपुरावा करून स्थगिती उठविली. त्याच वेळी जिल्हयातील इतर तालुक्याच्या बंधाऱ्यांच्या कामांची स्थगितीही उठविण्यात आली होती. इतर तालुक्यांतील कामांची निविदा प्रक्रिया पुर्ण होऊन ही कामे पुर्णही झाली. पारनेर तालुक्यातील कामांची निविदा प्रक्रिया मात्र रोखण्यात आली होती.त्याबाबत मी संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही स्थगिती उठविण्यास टाळाटाळ करण्यात येत होती.या स्थगितीमागे राजकारण करण्याचा सदैव प्रयत्न केला जात होता.वारंवार पाठपुरावा करूनही निविदा प्रकिया राबविली जात नसल्याने मी दि.१७ मार्च-२०२३ रोजी निविदा प्रक्रिया राबविण्याच्या मागणीसाठी पुणे येथील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. तसे पत्रही संबंधित कार्यालयास देण्यात आलेे होते.
सोमवार दि.२७ मार्च २०२३ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मी व माझ्या सर्व सहकारी यांनी मृद व जलसंधारण कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. मतदारसंघातील शेकडोे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अप्पर आयुक्त जलसंधारण तथा मुख्य अभियंता सुनील कुशेरे यांनी उपोषण स्थळी भेट घेऊन कामांची निविदा प्रक्रिया राबविण्याची तयारी दर्शविली. मात्र तात्काळ निविदा प्रक्रिया राबवा व तसे लेखी आश्‍वासन द्या अशी भूमिका मी व माझ्या सर्व शेतकरी बांधवांनी घेतल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सुनील कुशेरे यांनी ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात आल्याचे व मंगळवारी हे ऑनलाईन टेंडर सार्वजनिक होतील असे आश्‍वासन दिले.
त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी उपोषणास पाठींबा देण्यासाठी वडगांवशेरीचे आमदार सुनील अण्णा टिंगरे, निवृत्ती अण्णा बांदल माझ्या मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,पारनेर नगरपंचायतचे नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष आजी/माजी नगरसेवक तसेच असंख्य शेतकरी बांधव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
लेखी आश्‍वासन दिल्यानंतर विरोधी पक्षनेते मा.अजितदादा पवार यांनी फोन वर सविस्तर माहीती घेतल्यानंतर त्यांनी मुख्य अभियंता सुनील कुशेरे यांच्याशीही चर्चा करीत ही सर्व कामे उन्हाळयापूर्वीच करण्याचे निर्देश अजितदादा यांनी दिले.
माझ्या पारनेर-नगर मतदार संघातील ३० बंधाऱ्यांच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे लेखी आश्‍वासन देण्यात आल्यानंतर उपोषण मागे घेतले.
आमरण उपोषणास पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो!