नगर जिल्ह्यात ‘या’ युतीचा यशस्वी प्रयोग, भाजप मनसेची पहिली युती!

0
1372

अहमदनगर – राज्यात मनसे व भाजप युती करणार का यावर उलट-सुलट चर्चा रंगली असताना मात्र अहमदनगर जिल्ह्यात या युतीचा यशस्वी प्रयोग झाला आहे. पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत या युतीची ताकद पाहायला मिळाली. सर्व जागा जिंकत या युतीने निर्विवाद सत्ता मिळविली.

एकनाथवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीत मागील 10 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या या सोसायटीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भारतीय जनता पक्षाने युती करत सत्ता मिळविली आहे. त्यामुळे आता अहमदनगर जिल्ह्यात भाजप बरोबर विविध ठिकाणी मनसे दिसणार असल्याची चिन्हे निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.मनसेचे जिल्हाध्यक्ष देवीदास खेडकर व भाजपचे तालुका सरचिटणीस बाबा सानप, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भगवान गायकवाड यांच्या नेतृत्त्वाखाली श्रीकृष्ण शेतकरी पॅनल तयार केला. या पॅनलने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलचा पराभव करत सत्ता मिळविली आहे. महाविकास आघाडीचा पहिला प्रयोगही अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यात प्रथम झाला होता. आता भाजप व मनसेच्या युतीचा प्रयोगही नगर जिल्ह्यातूनच प्रथम होत असल्याची चर्चा आहे.