Monsoon 2022 skymate
भारतातील सर्व शेतकरी मान्सूनच्या या अंदाजावर अवलंबून असतात. भारतातील अग्रगण्य वेदर फॉरकास्टिंग आणि अॅग्रीकल्चर रिस्क सोल्युशन कंपनी असलेल्या स्कायमेटनं 2022 या वर्षातील मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे.
स्कायमेटच्या (skymate)अंदाजानुसार भारतामध्ये या वर्षी सरासरी 98 टक्के (+/- 5 टक्के इरर मार्जिनसह) पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच यावर्षी आपल्याकडे मान्सून ‘सामान्य’ राहण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीसाठी सरासरी 880.6 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. जो एलपीएच्या 98 टक्के इतका असेल. स्कायमेटनं 21 फेब्रुवारी 2022 रोजी यावर्षीचा सर्वात पहिला मान्सून फॉरकास्ट जाहीर केला होता. आपल्या या पहिल्या प्राथमिक अंदाजावर ठाम राहत स्कायमेटनं यावर्षी मान्सून सामान्य असल्याचं म्हटलं आहे. या वर्षी एकूण 96 ते 104 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्कायमेटनं आपल्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत माहिती प्रसिद्ध केली आहे.
मान्सूनच्या भौगोलिक वितरणाचा विचार केल्यास, राजस्थान, गुजरात तसंच नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या ईशान्येकडील राज्यांमध्ये संपूर्ण हंगामात पावसाची कमतरता जाणवेल, अशी शक्यता स्कायमेटनं व्यक्त केली आहे. या व्यतिरिक्त, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत केरळ आणि कर्नाटकात कमी पाऊस पडेल. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या उत्तर भारतातील कृषी क्षेत्रांत आणि महाराष्ट्र व मध्य प्रदेशमधील काही भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल. पावसाळ्याच्या पूर्वार्धात जास्त पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. जूनच्या सुरुवातीलाच मान्सूनची चांगली सलामी देईल अशी अपेक्षा आहे.