केवळ एमआयडीसी मंजूर करून काम भागत नाही… कर्जतच्या प्रश्नावर खा.विखेंची भूमिका

0
44

कर्जत तालुक्यातील एमआयडीसीचा प्रश्न सध्या राज्यात गाजत आहे. अधिवेशनात आणि अधिवेशनाच्या बाहेरही हा मुद्दा पेटला आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांच्यातील श्रेयवाद असल्याचेही आता लपून राहिले नाही. या मुदद्यावर नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही आता भाष्य केले आहे. केवळ एमआयडीसी मंजूर करून काम भागत नाही. तेथे उद्योग येणे आणि ते सुरळीत चालणे आवश्यक असते. त्यासाठी पायाभूत सुविधा आणि तसे वातावरण तेथे आवश्यक असते, असे विखे पाटील म्हणाले आहेत.

प्रसारमाध्यमांनी यासंबंधी विखे पाटील यांना भूमिका विचारली. त्यावर विखे पाटील म्हणाले, एमआयडीसी त्या भागाच्या विकासासाठी आवश्यक ठरते. मात्र, केवळ मंजुरी मिळाली म्हणजे हे काम होत नाही. राज्य सरकार तेथे जागा आणि सुविधा देते. मात्र, तेथे चांगल्या कंपन्या येण्यासाठी, त्या सुरळीत चालण्यासाठी लोकप्रतिनिधींना पाठपुरावा करावा लागतो. जेथे एमआयडीसी सुरू करायची आहे, तेथे किती आणि कोणत्या कंपन्या येण्यास उत्सुक आहेत, त्यांना येथे अनुकूल वातावरण आहे का? याचा विचारही करावा लागतो. एमआयडीसी मंजूर करतानाच अशी कोणकोणत्या कंपन्यांची तेथे येण्याची इच्छा आहे, कोणाची मागणी आहे याबद्दल लोकांना विश्वास द्यावा लागतो. कंपन्या आल्या नाहीत तर भूखंड रिकामे पडतात. नगर जिल्ह्यात आधीच अशी काही उदाहरणे आहेत. सुपा एमआयडीसी सोडली तर अन्यथा फारसे चांगले वातावरण नाही. सुपा एमआयडीसीतील उद्योजकांनाही अनेक अडचणी येत आहेतच. लोकप्रतिनिधींना उद्योग स्नेही वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. अन्यथा कागदावरच्या एमआयडीसीचा काहीही उपयोग होत नाही, असेही विखे पाटील म्हणाले.