महसूल विभागात, विभागीय आयुक्त कार्यालयांमध्ये लघुलेखक संवर्गातील पदे भरा,मंत्री बावनकुळे यांना खा. लंके यांचे निवेदन

0
47

मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांना खा. लंके यांचे निवेदन

अहिल्यानगर : प्रतिनिधी

महसूल विभागातील अनेक जिल्हाधिकारी कार्यालये व विभागीय आयुक्त कार्यालयांमध्ये लघुलेखक संवर्गातील अनेक पदे मोठया प्रमाणावर रिक्त झालेली असून ही पदे तात्काळ भरण्याची मागणी खा. नीलेश लंके यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आपल्या निवेदनात खा. लंके म्हणतात, अनेक ठिकाणी लघुलेखकाऐवजी कामकाजासाठी अन्य संवर्गातील कर्मचाऱ्यांनी तिथे नेमणूक करण्यात येत आहे. त्यामुळे लघुलेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. लघुलेखक या पदाची कौशल्य आर्हता अन्य कर्मचाऱ्यांपेक्षा भिन्न आहे. असे असतानादेखील लघुलेखनाचे कौशल्य अन्य संवर्गातील कर्मचाऱ्यांकडे नसताना देखील त्यांना लघुलेखन पदाचा कार्यभार दिला जात आहे. एकीकडे राज्यभरात अनेक बेरोजगार युवक-युवती लघुलेखन क्षेत्रात नोकरीची संधी शोधत आहेत. तसेच काही पात्र लघुलेखक पुढील पदोन्नतीची वाट पाहत आहेत.

कामकाजात सुलभता येईल

लघुलेखक विद्यार्थी व विद्याथनींच्या मागणीचा विचार करून शासकीय कामकाजात सुलभता येईल व बेरोजगार युवक-युवतींना शासन सेवेची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयांमध्ये रिक्त झालेली लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, उच्च श्रेणी लघुलेखक व स्वीय सहाय्यकांची रिक्त झालेली पदे सरळसेवेने, पदोन्नतीने तात्काळ भरण्याबाबत नियमानुसार पुढील उचित कार्यवाही करण्याची मागणी खा. लंके यांनी केली आहे.

लोकसेवा आयोगाची जाहिरात प्रसिध्द करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दर तीन वर्षांनी मंत्रालयीन विभाग श्रेणीय कार्यालयातील उच्च श्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक पदाकरिता जाहिरात प्रसिध्द केली जाते. या पदांसाठी सन २०१८ मध्ये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. पुढील जाहिरात २०२१ मध्ये येणे अपेक्षित होते. मात्र कोव्हीडच्या प्रभावामुळे ही जाहिरात २०२२ मध्ये प्रसिध्द करण्यात आली. या पदासाठी २०२५ मध्ये जाहिरात प्रसिध्द करण्याची मागणी खा. लंके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

विद्यार्थ्यांमध्ये उदासिनता

मागील दोन वर्षांपासून अनेक विद्याथ या पदाच्या परीक्षेचा सराव करत आहेत. मात्र जाहिरात प्रसिध्द होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये उदासिनता निर्माण झालेली आहे. विद्यार्थ्यांचे वाढते वय, कुटूंबाची जबाबदारी व बेरोजगारी या सर्व गोष्टींचा विद्यार्थ्यांच्या मनावर प्रतिकूल परिणाम होत आहे. विद्यार्थी वर्गात नैराश्याचे वातावरण निर्माण होत आहे. जाहिरात प्रसिध्द करून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची आग्रही मागणी खा. लंके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.