भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात नगर जिल्ह्यात पोलिस प्रशासनाचा गैरवापर होत असल्याची टीका केली.
खासदार वि जिल्हा रुग्णालयात एका कार्यक्रमा निमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. पारनेर तालुक्यातील शिवसेनेच्या नगरसेवकावर आठवड्याभरात दोनदा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले. या संदर्भात विचारले असता खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, ही गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया झाली त्याची वास्तविकता काय आहे आणि पोलिस प्रशासन काय कारवाई करते आहे? पारनेर तालुक्यामध्ये सरकारी यंत्रणापूर्णपणे दबावात काम करते हे मी अनेक वेळा बोललो आहे आणि तर ही सुरवात आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये पोलिस प्रशासनाचा वापर करून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आवाज दाबण्याचे काम होत आहे. ते टीव्हीवरही दाखविले जात आहे. पारनेर तालुक्यातही तेच होत आहे. हळूहळू जिल्ह्यात अशा काही घटना समोर येत आहेत. पारनेरमध्ये घडलेली घटना चुकीची आहे, यात शंका नाही. मात्र करणारे वेगळे राहतात आणि कारण नसताना विशिष्ट व्यक्तीचे नाव टाकून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणे ही जी प्रथा अहमदनगर जिल्ह्यात सुरू झाली आहे ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे, असे त्यांनी सांगितले.






