नगर : कर्जत जामखेड मतदारसंघात खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार रोहित पवार यांच्यात विकासकामांच्या श्रेयवादावरुन राजकारण पेटले आहे. तालुक्यात कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांवरही आमदारांकडून दबावतंत्र सुरु आहे, असा आरोप विखे पाटील यांनी केला. तालुक्यातील अधिकारी हसताना दिसतो का ? एक नाही तर दहा आमदार असावेत एवढे पीए आणि यंत्रणा आहेत. त्यातून हे दबाव तंत्र सुरु असून वेळ आल्यावर त्यावर बोलू, असा इशारा त्यांनी रोहित पवार यांना दिला आहे. कर्जत तालुक्यातील शितपूर येथे सभामंडपाच्या उद्घाटनप्रसंगी विखे पाटील बोलत होते.
सुजय विखे पाटील म्हणाले, मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते कर्जतमधील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहाचे उद्घाटन करण्यात आले. या कामाची मंजुरी माजी मंत्री राम शिंदे यांनी दिली. निधीही त्यांनीच आणला. पण नारळ फोडण्यासाठी भलतेच लोक गोळा झाले. नाव न घेता विखे पाटील रोहित पवारांना उद्देशून म्हणाले, आमदार राष्ट्रीय महामार्गाची पाहणी करुन त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. मिरजगावमधील रस्त्याची दुरवस्था पाहावी. राष्ट्रीय महामार्गाचे काम आमच्यावर सोडा, तुम्ही आणलेल्या निधीतील रस्ता तरी पूर्ण करा, असा खोचक टोला सुजय विखे पाटील यांनी रोहित पवार यांना लगावला आहे.






