अहमदनगर (प्रतिनिधी)- खरेदीखतासोबत नगर रचना विभागाच्या बांधकाम परवानगी व रेखांकन आराखड्यांचे बनावट आदेश जोडून मालमत्तेची विक्री करत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी वडगाव गुप्ता येथील एकावर नगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरुण मारुती शेवाळे (रा.वडगाव गुप्ता, ता.नगर) असे आरोपीचे नाव आहे. याबाबतची फिर्याद सावेडी मंडल अधिकारी जगन्नाथ गोरक्षनाथ धसाळ यांनी जिल्हा प्रशासनातर्फे दिली आहे. आरोपी अरुण शेवाळे यांनी त्यांच्या वडगाव गुप्ता गावातील मिळकत ही नगर रचना विभागाचे बनावट बांधकाम परवानगी व रेखांकन आराखडा आदेश तयार करुन ते खरेदीखताला जोडून त्याद्वारे सदरची मिळकत त्यांच्या पत्नी वैशाली अरुण शेवाळे यांना कायमस्वरुपी विक्री केली होती. ही घटना सन 2016 मध्ये घडली होती. या खरेदी खताची व कागदपत्रांची चौकशी करण्याची मागणी गावातील भानुदास रामचंद्र काळे व संतोष रामचंद्र काळे यांनी तहसीलदार नगर यांच्याकडे दि.6 ऑक्टोबर 2020 रोजी निवेदनाद्वारे केली होती.
या तक्रारीवरुन केलेल्या चौकशीत आरोपी अरुण शेवाळे यांनी बनावट बांधकाम परवानगी व रेखांकन आराखडे तयार केल्याचे आढळून आले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सावेडीचे मंडल अधिकारी जगन्नाथ धसाळ यांना प्राधिकृत करुन याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचे आदेश दिले होते. या आदेशावरुन धसाळ यांनी फिर्याद दिली असून कोतवाली पोलिसांनी आरोपी शेवाळेविरुद्ध भा.दं. वि.क. 464, 465, 467, 468, 470, 471, 472, 474 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.






