अल्पवयीन मुलीचे अपहरण करणार्‍यास तीन वर्ष सक्तमजुरी,नगर तालुक्यातील घटना

0
18

नगर तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याबद्दल सागर आनंदा सुरे (वय 23 रा. पिशोरे, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) याला तीन वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रूपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी ठोठावली. अ‍ॅड. वैशाली राऊत यांनी सरकारतर्फे काम पाहिले.
नगर तालुक्यातील एका गावामध्ये तीन वर्षांची मुलगी 13 मार्च 2022 रोजी सकाळी सव्वा आठ वाजता घराजवळ खेळत होती. त्यावेळेस सागर आनंदा सुरे हा दुचाकीवरून तेथे आला. त्याने दुचाकीवरून मुलीला घेऊन गेला. शेजारी असलेल्या दुकानदाराने ही घटना मुलीच्या घरच्यांना सांगितली. मुलीच्या वडिलांनी गावातील इतरांना फोनद्वारे ही माहिती दिली.

गावातील ग्रामस्थांनी रस्ते अडवून आरोपी सागर सुरे याला पकडले. त्याच्या ताब्यातून अल्पवयीन मुलीची सुटका केली. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात सागर सरे याच्या विरोधात अपहरण आणि बालकांचे लैंगिक संरक्षण कायदा 2012 (पोस्को) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक रणजित मारग यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.या खटल्यात सरकारतर्फे 15 साक्षीदार तपासण्यात आले. सागर सुरे हा दोषी ठरल्याने त्यास शिक्षा ठोठावण्यात आली. पोलीस अंमलदार आर. व्ही. बोर्डे यांनी पैरवी अधिकारी म्हणून सहकार्य केले.