नगर अर्बन बँक बुडवण्यास कारणीभूत असलेले दोषी संचालक व अधिकार्यांसह थकबाकी असलेल्या कर्जदारांच्या मालमत्ता या जिल्हा प्रशासनाच्या रडारवर घेतल्या जाणार आहेत. पालकमंत्री यांनी तशा स्पष्ट सूचना दिल्या आहे. तातडीने जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, बँकेचे अवसायक, जिल्हा सहकार उपनिबंधक व ठेवीदार प्रतिनिधींची बैठक घेण्याचे आणि कर्जदार, दोषी संचालक व अधिकार्यांच्या मालमत्ता जप्त करून त्यांचे लिलाव करण्याचे नियोजन करण्यासही सांगितले आहे.
नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांनी शुक्रवारी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेतली. प्रजासत्ताकदिनाच्या ध्वजवंदनानंतर पोलिस मुख्यालयात बँक बचाव कृती समितीचे प्रमुख व बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी व ठेवीदारांचे प्रमुख डी. एम. कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली विलास कुलकर्णी, बबईताई वाकळे, सुमन जाधव, दिनकर देशमुख, अवधूत कुक्कडवाल आदींनी मंत्री विखेंसमोर व्यथा मांडल्या. बँकेचा व्यवसाय परवाना रद्द होऊन सहा महिने होत आले आहेत. बँकेत कर्ज वितरणात गैरप्रकार झाले असून फॉरेन्सिक ऑडिटमधील मुद्यांनुसार पोलिसांकडून कारवाई सुरू आहे.
विशेष पोलिस पथकही नेमण्यात आले आहे. मात्र, बरेच आरोपी फरार आहेत. या फरार आरोपींचा शोध घेतला जावा. तसेच या आरोपींच्या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करावा व ठेवीदारांचे पैसे द्यावेत, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली. या मागणीची दखल घेऊन यानुसार तातडीने संबंधित सर्व अधिकार्यांची बैठक घेऊन नियोजन व कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.