तिसगाव बाजार समितीत दिवसभर व्यापारीच फिरकले नाहीत. तसेच तीन दिवसांपासून कांद्याला चक्क पन्नास पैसे व एक रुपया किलो प्रमाणे भाव दिला गेल्याचे निदर्शनास येताच संतप्त कांदा उत्पादक शेतकर्यांनी तिसगाव उपबाजार समितीच्या प्रवेशद्वारातच कांद्याची होळी करून आपला संताप व्यक्त केला.
गेल्या काही दिवसापासून कांदा उत्पादक शेतकर्यांच्या कांद्याला समाधानकारक भाव मिळत नसल्यामुळे शेतकर्यांचा पिकाचा खर्चही वसुल होत नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशातच मंगळवारी तिसगाव उपबाजार समितीमध्ये अनेक शेतकरी कांदा घेऊन आले परंतु दुपारी तीन वाजेपर्यंत उपबाजार समितीमध्ये एकही कांदा व्यापारी उपस्थित नसल्यामुळे दिवसभर कांदा उत्पादक शेतकर्यांना या ठिकाणी थांबून राहण्याची वेळ आली.
तसेच गेली तीन ते चार दिवसांपूर्वी कांद्याला 50 पैसे व एक रुपया किलो प्रमाणे भाव मिळाल्याचे देखील काही उपस्थित शेतकर्यांनी सांगितल्याने शेतकर्यांचा पारा आणखीनच चढला. कांद्याला भाव मिळत नसल्याने कांद्याच्या गोण्या ट्रॅक्टर जीप मधून उप बाजार समितीच्या प्रवेशद्वारा पुढे टाकून या कांद्यावर अक्षरशा पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आले. भाव मिळत नसल्याने शेतकर्यांनी कांद्याची होळी केल्याने उपस्थितांनी देखील मोठी हळहळ व्यक्त केली. यावेळी शेतकरी अनिल वाघमारे, सुनिल लवांडे,लियाकत शेख, संदीप आव्हाड, अर्षद शेख यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.