नगर : काही लोकांना कमी काळात आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याचा भास झाला, त्याला आपण काही करू शकत नाही, अशी टीका नाव न घेता सुजय विखे यांनी आमदार निलेश लंके यांच्यावर केली आहे. भाजपा आयोजित एका कार्यक्रमात सुजय विखे यांनी हा घणाघात केला आहे. ते म्हणाले, की कुणाला वाटत असेल सुजय विखे कुणाला घाबरतो, सुजय विखेला दडपण आले आहे. मात्र असे अजिबात नाही. एक महिन्यात पारनेर तालुक्यातून एकही अनधिकृत वाळूचे डंपर जाणार नाही, असा इशारा देखील सुजय विखे यांनी दिला आहे. तसेच तहसीदारांमार्फत धाडी टाकून गरीबांकडून पैसे वसूल करणे पारनेर तालुक्यात आजपासून बंद होणार, असा इशाराच त्यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील अनधिकृत वाळू उपसासंदर्भात त्यांनी आक्रमक होत हे प्रकार बंद होणार असल्याचे म्हटले आहे. राधाकृष्ण विखे जोपर्यंत महसूल मंत्री आहेत, तोवर एक महिन्यामध्ये एकही अनधिकृत वाळूचे डंपर पारनेर या ठिकाणाहून जाणार नाही, असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला आहे. आम्हाला नको आहेत असे कार्यकर्ते जे वाळू उपसा करतात, आम्हाला नकोत ते गुंड ज्यांच्यापासून समाजाला धोका आहे, असे ते म्हणाले.






