नगर: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानंतर आता नगर जिल्ह्यात बहुतेक मार्गावर बससेवा पूर्ववत सुरू झाली आहे. त्यामुळे अनेक जण बस प्रवासाला प्राधान्य देत आहेत. मात्र हा बस प्रवास एका महिलेला चांगलाच महागात पडला. बसमध्ये जवळ बसलेल्या अनोळखी महिलेने करंजी ते पाथर्डी असा प्रवास करता असताना एका महिलेच्या बॅगेतून एक लाख तेरा हजार पाचशे रुपयांची सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेले आहे. पाथर्डी तालुक्यातील धारवाडी येथील महिला कमल देविदास गवळी (वय 35) ह्या रविवारी सकाळी तालुक्यातील मोहरी या गावी भाच्याच्या लग्नासाठी करंजी येथून एसटी बसमधून पाथर्डीकडे प्रवास करायला बसल्या होत्या.
त्यावेळी या प्रवासादरम्यान त्यांच्या शेजारी बसलेल्या अनोळखी महिलेने त्यांच्या बॅगेतून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली.
गवळी या मोहरी याठिकाणी आले असता त्यांचे दागिने बॅगेत नसल्याचे लक्षात आले. बसमध्ये बसलेल्या अनोळखी महिलेने गवळी यांच्या बॅगमधील पाकिट काढुन घेतले अशी खात्री पटल्यांनंतर कमल गवळी यांच्या फिर्यादीवरून अनोेळखी महिले विरोधात पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.