राज्यातील शेतकऱ्यांना अवकाळीने पुन्हा फटका दिला. गारपीटीने हातातोंडाशी आलेले पीक गेले. विदर्भासह मराठवाडा आणि राज्यातील इतर भागात नुकसान झाले. दरम्यान शेतकऱ्यांना आज पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ दौऱ्यावर आहेत. यवतमाळ-नागपूर रस्त्यावरील भारी येथे त्यांचा कार्यक्रम आहे. याठिकाणी ते कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा हप्ता जमा करतील. पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता जमा होणार आहे.
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 16 हप्ता आज 28 फेब्रुवारी रोजी जमा करण्यात येईल. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल. पीएम किसानच्या संकेतस्थळानुसार, पीएम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. ओटीपी आधारे ई-केवायसी, पीएम किसान पोर्टलवर करता येऊ शकते. या बायोमॅट्रिक आधारीत ई-केवायसीसाठी जवळच्या CSC केंद्रावर संपर्क साधता येईल.
मोदी सरकारने 2019 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपर्वी पीएम किसान योजनेची घोषणा केली होती. मार्च महिन्यात पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 15 हप्त्यांच्या माध्यमातून 2.8 लाख कोटी रुपये जमा केले आहेत.






