सहाय्यक पोलिस निरिक्षकावर हल्ला; गुन्ह्यातील ६ जणांना अटकपुर्व जामीन

0
753

नगर – पाथर्डी तालुक्यातील कासुळवाडी येथील सहाय्यक पोलिस निरिक्षकावर खुनी हल्ला केल्याच्या गुन्ह्यात सहा संशयित आरोपींना जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.

अधिक माहिती अशी, 20 मार्च 2022 रोजी जालना येथे नेमणुकीस असलेले सहाय्यक पोलिस निरिक्षक सुरेश बापूराव कासुळे कामानिमित्त मूळगाव कासुळवाडी येथे आले होते. गावातील वादातून काही लोकांनी त्यांना सकाळी 9.30 वाजता कोयता, लोखंडी रॉड, काठी दगडाने मारहाण करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

याबाबत पाथर्डी पोलिस ठाण्यात भादंवि कलम 307, 324, 108, 323, 143, 147, 149, 504, 506 अन्वये बाबासाहेब किसन काकडे, अंबादास लक्ष्मण कासुळे, बाळू बाबासाहेब काकडे, जिजाबाई भाऊसाहेब कासुळे, अरुणा कालिदास काकडे, शशिकला अप्पासाहेब कासुळे (सर्व रा. कासुळवाडी) यांच्यासह इतर लोकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

वरील सहा जणांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला असता, न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. तर आरोपी साईनाथ भाऊसाहेब कासुळे, कालिदास बाबासाहेब काकडे व आप्पासाहेब लक्ष्मण कासुळे यांना अटकेनंतर नियमित जामीन मंजूर झाला. जिल्हा न्यायालयात अर्जदारातर्फे अ‍ॅड.अंकिता ए. सुद्रीक यांनी काम पाहिले.