देशात पुढील वर्षी म्हणजे 2024 मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. पण वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी मात्र सद्यस्थिती पाहता येत्या दीड महिन्यांत देशात लोकसभेची निवडणूक लागेल, असा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजी नगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना लोकसभा निवडणुकीविषयी उपरोक्त भाकित वर्तवले आहे. ते म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीत दीड महिन्यांत होतील. दीड महिन्यांत तुम्ही मला याविषयी विचारा. त्यावेळी मी सांगतो. आम्ही या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. आम्ही भाजपविरोधात लढू. स्वतःचे उमेदवार उभे करू
आंबेडकरांनी यावेळी आपला महाविकास आघाडीशी कोणताही संबंध नसल्याचेही स्पष्ट केले. ते म्हणाले की, आमची शिवसेनेच्या ठाकरे गटाशी युती आहे. आमचा महाविकास आघाडीशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे या निवडणुकीत काय करायचे हे महाविकास आघाडीने स्वतः ठरवायचे आहे. आम्ही शिवसेनेसोबत आहोत. त्यांनी त्यांचे पहावे. आम्ही त्यांना का डोके लावावे. आम्ही आमचा बीपी का वाढवून घ्यावा.