मुळा धरणातून उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रात १ सप्टेंबरपासून शेती सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्याचे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जाहीर झाल्याने लाभार्थी शेतकऱ्यांचे या पाणी आवर्तनाकडे लक्ष लागले आहे. राहुरी, नगर, पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील काही गावांचे 70 हजार हेक्टर क्षेत्राचे शेती सिंचन मुळा उजव्या कालव्यावर अवलंबून आहे. मुळा धरणात सध्या 84 टक्के म्हणजे 22 हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा असून उजव्या कालव्यासाठी 35 दिवस हे आवर्तन चालणार आहे.
पावसाळा ऋतुचा अडीच महिन्याचा कालावधी उलटला असताना लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस झालेला नाही. पाण्याअभावी पिके करपून गेली आहेत. खरीप हंगामातील उभी पिके जगवण्यासाठी विहिरीतील जेमतेम पाण्यावर शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. 26 हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठवण क्षमता असलेल्या मुळा धरणाचा पाणीसाठा 22 हजार दशलक्ष घनफुटापर्यंत जावून पोहोचल्याने धरण 84 टक्के भरले आहे. उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील पिके वाचवण्यासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या खरीप हंगाम नियोजन बैठकीत उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात 1 सप्टेंबरला पाण्याचे आवर्तन सोडण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. आवर्तन कालावधी 35 दिवसांचा असल्याने कमीतकमी पाण्यात हे सिंचन आवर्तन होण्याचा निर्णय बैठकीत झाला आहे. उजव्या कालव्यावर अनाधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी वीज पुरवठा खंडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी मुळा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रात पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. या पाठोपाठ 5 दिवसांपूर्वी वांबोरी चारीला पाणी सोडण्यात आले. 1 सप्टेंबरला धरणातून मुळा उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात पाणी सुटण्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. एकीकडे लाभक्षेत्रात पावसाने दडी मारलेली असतानाच दुसरीकडे मंगळवारपासून हरिश्चंद्रगडावर पाऊस मंदावल्याने कोतूळकडून मुळा धरणात येणारी पाण्याची आवक निचांकी झाली आहे.