नगर तालुक्यात विहिरीचे काम करताना अंगावर खडक कोसळून दोघांचा मृत्यू

0
3088

अहमदनगर- विहीर खोदण्याचे काम करणाऱ्या दोघांच्या अंगावर खडक, मातीचा ढिगारा कोसळून मृत्यू झाल्याची घटना सारोळाबद्धी (ता. नगर) शिवारात रविवारी (दि. १७) दुपारी घडली. मृत दोन्ही कामगार आष्टी तालुक्यातील लोणी सय्यदमीर येथील रहिवासी आहेत.

प्रल्हाद रोहिदास रक्ताटे (वय २८) व विलास शिवाजी वाळके (वय ४०, रा. लोणी सय्यदमीर, ता. आष्टी) अशी मृत कामगारांची नावे आहेत. याबाबत नगर तालुका पोलिसांनी सोमवारी माध्यमांना माहिती दिली. ती अशी की, सारोळाबद्धी शिवारातील बोरुडे या शेतकऱ्याच्या विहिरीच्या खोदाईचे काम सुरू होते. यासाठी ब्लास्टिंग करण्यात येणार होते. ब्लास्टिंगची स्फोटके ठेवण्यासाठी खडकाला ड्रिल मशिनच्या साहाय्याने छिद्र पाडण्याचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक खडक व मातीचा ढिगारा कोसळला. या ढिगाऱ्याखाली विहिरीचे काम करणारे दोन कामगार गाडले गेले या घटनेनंतर इतर कामगार व स्थानिक नागरिकांनी त्यांना बाहेर काढून उपचारासाठी नगरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.