अहमदनगर-अधिक मास सुरू असल्याने सध्या सगळीकडेच जावयांच्या धोंड्यांच्या जेवणाची धूम सुरू आहे .जावयांना धोंड्याचे गोडधोड जेवण देण्यासाठी सासुरवाडीच्या लोकांची सध्या लगबग सुरु आहे. त्याचे सोशल वरही सिलेब्रेशन फोटो सुरू आहेत .मात्र नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी या गावात जावयांना धोंड्याचे जेवण खाऊ न घालण्याची जुनी प्रथा आजही कायम आहे.
नगरपासून १२ किलोमीटरवरील पिंपळगाव उज्जैनी
या गावाने वर्षानुवर्षे जावयांना धोंडें खाऊ न घालण्याची ही परंपरा जपली आहे . आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही या गावाने या प्रथेचे कडक पालन केले आहे. अधिक मासात प्रत्येक सासुरवाडीत आपल्या जावयांना धोंडे खाऊ घालण्याची परंपरा महाराष्ट्रात पाळली जाते. सध्या सगळीकडेच आपल्या लाडक्या जावयाला घरी बोलाऊन त्यांना गोडधोड जेवण देऊन काहीतरी किमती वस्तु भेट म्हणुन दिली जाते . लेकीचेही या निमित्ताने माहेरची मंडळी आदरातिथ्य केले जाते .
ग्रामीण भागात अधिक महिन्याला धोंड्याचा महिनाच संबोधले जाते . या महिन्यात जावई व त्याच्या घरातील लोकांना पुरणपोळी व इतर गोडधोड जेवण खाऊ घातले जाते. त्यात जावई नवा असला तर त्याची जास्तच बडदास्त ठेवली जाते. सर्वजण जावयाची खातरदारी करण्यात मग्न असतात. जावयांना जेवणाबरोबर नवे कपडे व आपल्या आर्थिक कुवतीप्रमाणे समोर आल्या. कुवतीप्रमाणे इतर भेटवस्तु दिल्या जातात. मात्र पिंपळगाव उज्जैनी गाव या परंपरेला अपवाद ठरले आहे.
प्रथा नेमकी उलटी आहे. या गावात कुणीच जावयांना धोंड्याचे जेवण खाऊ घालण्यासाठी घरी आमंत्रित करीत नाहीत. ही प्रथा कशी पडली व या प्रथेचे नेमके कारण काय?, याची माहिती गावातील कोणालाही सांगता येत नाही, इतकी ही परंपरा जुनी आहे. या गावातील लोकांशी चर्चा केल्यानंतर काही बाबी समोर आल्या .
या गावात कधी काळी कोणी आपल्या जावयांना अधिक मासात धोंडें खाऊ घातले आणि जावयाच्या घरी दुर्घटना घडली, असा अनुभव जुन्या काळात अनेकांना आला. यामुळे आपण धोंडे जेवण देण्याच्या प्रथेमुळेच या दुर्घटना घडत आहेत, असा गावकऱ्यांचा समज झाला. काहींच्या मते अधिक मासात जावयांना धोंडे खाऊ घातल्यास गावात रोगराई सुरू झाली. यामुळे अनेकांचा जीव गेला. यामुळे गावाने अधिक मासात जावयांना धोंड्यांचे जेवण खाऊ घालण्याची प्रथाच एकमुखाने बंद केली .
धोंडे खाऊ घातल्यास काहीतरी दुर्घटना घडते ही भावना या गावकऱ्यांच्या मनात पक्की बसली. तेथून पुढे या गावाने ही प्रथाच बंद करून टाकली. तेव्हापासून या गावातील कोणताच सासरा आपल्या जावयाला अधिक मासात आपल्या घरी धोंडे खायला बोलावत नाहीत . ही जुनी प्रथा आजही कायम आहे .
आमच्या गावात अधिक मासात जावयांना धोंडें खाऊ न घालण्याची प्रथा आहे . सर्व गावकरी या प्रथेचे पालन करतात . हि प्रथा कधीपासुन सुरू झाली हे कोणालाच ठाऊक नाही . परंपरेनुसार गावकरी त्या प्रथेचे पालन करतात . आजही ही प्रथा आम्ही पाळतो . — मोनिका आढाव ( सरपंच , पिंपळगाव उज्जैनी )