शिर्डी लोकसभा मतदार संघ हा काँग्रेसकडेच !तांबेंना पक्षात सन्मानाने घेतले जाणार

0
22

शिर्डी लोकसभा मतदार संघ हा काँग्रेसकडेच घेणार असल्याचे काँग्रेस पक्षाचे शिर्डी लोकसभा निरीक्षक माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी सांगितले. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत रविवारी हंडोरे बोलत होते.

आमदार लहू कानडे, ज्ञानदेव वाफारे, उत्कर्षा रूपवते, हेमंत ओगले, सचिन गुंजाळ, डॉ. एकनाथ गोंदकर, सचिन गुजर, राजेंद्र वाघमारे, अशोक कानडे, सोन्याबापू वाकचौरे, मीनानाथ पांडे, सुरेश थोरात, मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे यावेळी उपस्थित होते.

काँग्रेसला शिर्डी लोकसभा मतदारसंघात पोषक वातावरण असल्याचे चंद्रकांत हंडोरे यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीमध्ये समन्वय असल्याने शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसकडे घेणार असल्याचे ते म्हणाले. शिर्डी लोकसभा मतदारसंघात यापूर्वी शिवसेनेचे खासदार निवडून आले आहेत. मात्र, विद्यमान खासदार शिंदे गटात गेल्याने शिर्डीत काँग्रेस पक्षाला अनुकूल वातावरण आहे.

संपूर्ण देशात व राज्यात काँग्रेसला अनुकूल वातावरण आहे. अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर सोपवली असून येथील राजकीय बलाबल पक्ष संघटनेची स्थिती बघावी. पक्ष मजबूत करण्यासाठी काय करता येईल, केंद्र सरकारने दिलेली आश्वासने पाळली की नाही याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणे. जातीय, धर्मवाद समाजात निर्माण केला जात आहे.

हे जनतेमध्ये जाऊन सांगणे, 48 मतदार संघामध्ये आमच्या पक्षाची ताकद काय आहे, विधानसभेपासून ते ग्रामपंचायतीपर्यंत काँग्रेसच्या स्थितीचा आढावा घेतला जात आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला मानणारा मतदार मोठा आहे. ही जागा काँग्रेसलाच मागणार असल्याचे ते म्हणाले. आढावा बैठकी दरम्यान शिर्डीची उमेदवारी उत्कर्षा रुपवते यांना मिळावी यासाठी येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आग्रह धरला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे अनेक उमेदवार इच्छुक असून त्यांची नावे लवकरच मी वरिष्ठांकडे पाठवणार असल्याचे हंडोरे यांनी स्पष्ट केले आहे.माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना पक्षात घेतले जाईल. काँग्रेस कार्यकर्त्यांनी माजी आमदार डॉ. तांबे यांच्यावरील निलंबनाची केलेली कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी केली आहे. माजी आमदार डॉ. तांबे यांच्या प्रभावी नेतृत्वाची पक्षाला गरज असून त्यांना लवकरच सन्मानाने पक्षात घेतले जाईल, असे काँग्रेसचे नेते चंद्रकांत हंडोरे यांनी यावेळी स्पष्ट केले.