शेतकरी तरुणांची लग्ने रखडण्याची मोठी सामाजिक समस्या सध्या ग्रामीण महाराष्ट्राला भेडसावत आहे. प्रत्येक गावात लग्न रखडलेल्या ३० ते ४० वयोगटांतील किमान २५-३० तरुण सध्या आहेत. यामुळे अनेक गावांमध्ये लग्नासाठी विकत मुली आणण्याचे प्रमाण वाढले आहे.
जुन्नर तालुक्यातील एका ३२ वर्षीय शेतकरी तरुणाची फसवणूक झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या तरुणाने या रॅकेटमध्ये सामील असलेल्या संबंधित एजंट व तरुणीसह एका महिलेबाबत आळेफाटा पोलिसांना लेखी तक्रार केली; परंतु फसवणूक झालेल्या तरुणाचे लग्न आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत न झाल्याने पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल न केल्याने एजंटांचे प्रस्थ वाचत चालेले आहे.
जुन्नर तालुक्यातील एका गावातील एका शेतकरी तरुणाला शेतकरी असल्याने लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती. मुलगी मिळावी म्हणून एका ओळखीच्या व्यक्तीने त्याला पैसे दिल्यास मुलगी पाहुण देतो असे सांगितले. त्या व्यक्तीने अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेच्या एका एजंटशी संबंधित तरुणाचा संपर्क करून दिला. त्या एजंटने तरुणाला नाशिक जिल्ह्यातील एका गावात मुलगी दाखवली.






