नगर जिल्ह्यातील मुन्नाभाईला फरार, होण्यास मदत करणाऱ्या सरपंच ग्रामसेवकावर कारवाई करा

0
38

मुन्नाभाईला फरार करणाऱ्या चितळेवाडीच्या सरपंच, ग्रामसेवकावर कारवाई व्हावी
शाहू फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
बोगस डॉक्टरचे रॅकेट उघड होण्यासाठी प्रमाणपत्र व डिग्री तपासण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामस्थांवर चूकीचे उपचार करणाऱ्या चितळेवाडी (ता. पाथर्डी) येथील त्या मुन्नाभाईवर कारवाई करावी व त्या बोगस डॉक्टराला पाठिशी घालून फरार होण्यास मदत केल्याप्रकरणी सरपंच, ग्रामसेवक व संबंधीत व्यक्तींवर देखील कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शाहू फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचच्या वतीने करण्यात आली आहे. संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे, विशाल केदारी, सुभाष क्षेत्रे, सुनील सकट आदी उपस्थित होते.
चितळेवाडी (ता. पाथर्डी) येथे कलकत्ता (पश्‍चिम बंगाल) येथून आलेला डॉक्टर ग्रामस्थांवर उपचार करत आहे. त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय परवाना व डिग्री नसून, चुकीची वैद्यकीय सेवा देऊन ग्रामस्थांच्या जीवाशी खेळत असल्याचा दावा संघटनेने केला आहे.
गावातील सरूबाई वाल्हेकर (वय 75 वर्षे) यांनी राहुल बिस्वास या डॉक्टरकडे गुडघे दुखत असल्याने उपचारासाठी गेल्या होत्या. त्या डॉक्टराने त्यांना चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे त्याचा दुष्परिणाम होवून त्यांची प्रकृती खालवली. त्यांना अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र परिस्थिती अत्यंत खालवल्याने त्यांना पुणे येथील ससून रुग्णालयात पाचारण करण्यात आले आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया होऊन त्यांची गंभीर प्रकृती आहे. चुकीची उपचार केल्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. शासकीय वैद्यकीय अधिकारी यांनी देखील चुकीचा उपचार करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या बोगस डॉक्टरमुळे एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता आहे. चुकीच्या उपचाराची तक्रार सरपंच संजय चितळे व ग्रामसेवक भाऊसाहेब तिडके यांच्याकडे केली होती. त्यांनी तुम्हाला सहकार्य करतो, रुग्णाच्या दवाखान्याचा खर्च करायला लावतो असे बोलून त्यांनी त्या डॉक्टराला फरार केले. त्या डॉक्टराच्या सांगण्यावरुन जाट देवळा (ता. पाथर्डी) येथील दुसऱ्या डॉक्टराने एकाच्या खात्यावर ऑनलाईन 4 हजार रुपये पैसे पाठवले. मात्र त्या पैश्‍याचा स्विकार करण्यात आलेले नाही. बोगस डॉक्टरासाठी पैसे पाठविणाऱ्या जाट देवळा येथील डॉक्टराची देखील चौकशी केल्यास बोगस डॉक्टरचे रॅकेट उघड होणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
पाथर्डी पोलीस स्टेशन व आरोग्य विभाग यांनी सूचना काढून सर्व गावातील डॉक्टरांचे प्रमाणपत्र व डिग्री तपासाव्या, बोगस डॉक्टरांवर कारवाई करुन त्यांना पाठिशी घालणाऱ्यांवर देखील कारवाई करण्याची मागणी शाहू फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचच्या वतीने करण्यात आली आहे.