राज्यभर गाजलेल्या टीईटी घोटाळ्यात वशिल्यावर पास झालेल्या ७८०० शिक्षकांची यादी सध्या चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. महत्वाचे म्हणजे या यादीत जिल्ह्यातील खासगी शाळेत शिकविणार्या दहा शिक्षकांचा समावेश असल्याने शिक्षक वर्गात एकच खळबळ उडाली आहे.जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि खासगी शाळांमधील २०१३ नंतर टीईटी पास होऊन सेवेत दाखल झालेले ८० पेक्षा अधिक शिक्षक रडारवर आले होते. यामध्ये प्राथमिक, खासगी, माध्यमिक असे ४९ शिक्षकांचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी परीक्षा परिषदेकडे पाठविले होते. राज्यात टीईटी पास झालेल्या संशयीत शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पुणे सायबर क्राईम विभागाकडून तपासणी केली होती. त्यात ७८०० शिक्षक हे पैसे देऊन वशिल्याने पास झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली होती.जिल्ह्यातील यादीची जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून पडताळणी सुरू आहे. मात्र, ‘पुणे’तून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अहमदनगरच्या साधारणतः दहा शिक्षकांची या यादीत नावे असून, ते खासगी शाळेतील पहिली ते सातवीच्या वर्गातील असल्याचेही सांगितले जात आहे. माध्यमिकच्या ४९ शिक्षकांपैकी किती जण वशिल्यावर पास झाले, याबाबत शिक्षणविभागाकडून अद्याप पडताळणी सुरू असल्याचे सांगतिले जात आहे.