पाच कोटी 78 लाख रुपयांच्या अपहार प्रकरण, ‘ध्येय मल्टिस्टेट’चा व्हा. चेअरमन गजाआड

0
59

‘ध्येय मल्टीस्टेट’चा व्हाईस चेअरमन रोहिदास कवडेला ठोकल्या बेड्या
मुंबईच्या बदलापुर मधून घेतले ताब्यात, तोफखाना पोलिसांची ९ महिन्यानंतर कारवाई
नगर – नगर शहरासह जिल्ह्यात ‘ध्येय मल्टीस्टेट’च्या शाखा सुरु करून ठेवीदारांना ज्यादा परताव्याचे आमिष दाखवत कोट्यावधी रुपयांच्या ठेवी गोळा करून त्या परत न देता सर्व शाखा बंद करून ठेवीदारांची कोट्यावधींची फसवणूक केल्याच्या दाखल गुन्ह्यातील महत्वाचा आरोपी आणि ‘ध्येय’ चा व्हाईस चेअरमन रोहिदास सत्यदेव कवडे (रा. गुलमोहोर रस्ता, सावेडी) याला अखेर ९ महिन्यांनंतर तोफखाना पोलिसांनी पकडले आहे. त्याला मुंबईच्या बदलापुर येथून बुधवारी (दि.२६) रात्री ताब्यात घेण्यात आले आहे.
नगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी ‘ध्येय मल्टीस्टेट’च्या शाखा सुरु करून जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून व नंतर कोणत्याही प्रकारचा परतावा न देता सर्व शाखा बंद करून ११२ ठेवीदारांचे ५ कोटी ७८ लाख ६५ हजार रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले होते. या प्रकरणी ठेवीदार सुजाता संदीप नेवसे (रा. शिंदे मळा, सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पतसंस्थेचा चेअरमन विशाल लक्ष्मण भागानगरे (रा. पंचपीर चावडी, माळीवाडा), व्हा. चेअरमन रोहिदास सत्यदेव कवडे (रा. गुलमोहोर रस्ता, सावेडी), संचालक व सीईओ राहुल बबन कराळे (रा. टोकेवाडी ता. नगर) यांच्या सह ४ संचालक अशा ७ जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात दि. १६ मे २०२४ रोजी फसवणूक, महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार (एमपीआयडी) गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
गुन्हा दाखल झाल्यापासून गेल्या ९ महिन्यापासून सर्व आरोपी फरार झालेले होते. यातील २ संचालकांना न्यायालयाने अटकपूर्व जमीन मंजूर केलेला आहे. तर इतर ५ जण मोकाट होते. त्यामुळे ठेवीदारांमध्ये पोलिस तपासाबाबत तीव्र नाराजी पसरलेली होती. ठेवीदारांनी अनेकवेळा तोफखाना पोलिसांसह अतिरिक्त पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे यांना भेटून या आरोपींना अटक करण्याबाबत निवेदने दिली होती. त्यामुळे अखेर ९ महिन्यानंतर यातील एक आरोपी का होईना पकडला गेला आहे.
बदलापुरात भाड्याने खोली घेवून राहात होता आरोपी
या गुन्ह्याचे तपासी अधिकारी असलेले तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांना या गुन्ह्यातील २ नंबरचा आरोपी व्हाईस चेअरमन रोहिदास कवडे हा मुंबईतील बदलापूर येथे भाड्याने खोली घेवून राहात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. ही माहिती मिळताच त्यांनी पोलिस अंमलदार दत्तात्रय जपे, सुधीर खाडे, योगेश चव्हाण, बाळासाहेब भापसे सुनिल शिरसाठ यांचे पथक त्याला पकडण्यासाठी पाठवले. या पथकाने बदलापूर येथे जावून कवडेचा शोध घेत बुधवारी रात्री त्याला ताब्यात घेतले. त्याला पहाटे नगरमध्ये आणण्यात आले आहे. या गुन्ह्यातील कवडे हा महत्वाचा आरोपी असल्याने त्याच्याकडून बरीच माहिती पोलिसांना मिळण्याची शक्यता आहे. आरोपी कवडे याला दुपारी उशिरा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला दि.३ मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.