कायदा मंत्री किरेन रिजीजू यांना कायदे मंत्रीपदावरून हटवण्यात आलं आहे. त्यांच्याऐवजी अर्जुनराम मेघवाल हे नवे कायदा मंत्री म्हणून काम पाहणार आहेत. कायदेमंत्री म्हणून रिजीजू यांची कारकिर्द अत्यंत वादग्रस्त ठरली होती. त्यामुळे त्यांना पदावरून हटवण्यात आलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मोदी सरकारचा हा निर्णय किरेन रिजीजू यांच्यासाठी मोठा झटका असल्याचं सांगितलं जात आहे.
अर्जुन राम मेघवाल हे सध्या संसदीय कार्य आणि सांस्कृतिक मंत्री आहेत. त्यांच्याकडे आता कायदा आणि न्याय विभागाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे. मेघवाल हे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी होते. ते मूळचे राजस्थानचे आहेत. राजस्थानमधील एक मोठे नेते म्हणून ते परिचित आहेत. बिकानेर आणि फिलीपाईन्समधून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. त्यांनी एमए, एलएलबी आणि एमबीएच्या पदव्या घेतलेल्या आहेत.






